Chakan : रस्त्याच्या वादातून महिलेचा खून; पतीची चौघांविरोधात फिर्याद

एमपीसी न्यूज – घरासमोरील रस्त्याच्या वादातून चौघांनी मिळून एका महिलेचा खून केला. भांडी घासत असताना महिलेचे तोंड दाबून तिला घरात उचलून नेले आणि तिचा खून करण्यात आला. ही घटना आज (शुक्रवारी) सकाळी आठच्या सुमारास चाकण येथील मेदनकरवाडी येथे घडली.

कल्पना विक्रम शितोळे (वय 45, रा. मेदनकरवाडी) असे खून झालेल्या महिलेचे नाव आहे. त्यांचे पती विक्रम नारायण शितोळे (वय 48) यांनी याप्रकरणी चाकण पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार अनिल मधुकर हेंद्रे, सुवर्णा हेंद्रे, सिद्धेश हेंद्रे आणि सुशीला शांताराम भुसारे (सर्व रा. मेदनकरवाडी) यांच्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे.

  • पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, विक्रम यांच्या घरासमोरील रस्त्यावरून आरोपी आणि विक्रम यांच्यामध्ये मागील काही दिवसांपासून वाद होता. याच वादातून आरोपींनी विक्रम यांच्या पत्नी कल्पना घराबाहेर भांडी घासत असताना त्यांच्यावर हल्ला केला. भांडी घासत असताना आरोपींनी कल्पना यांना त्यांच्याच घरात तोंड दाबून उचलून नेले. घरात नेल्यावर त्यांना दगडी पाटा, लाकडी दांडके आणि कुकरच्या झाकणाने बेदम मारहाण केली. दगडी पाटा डोक्यात घातल्याने कल्पाना गंभीर जखमी झाल्या. त्यातच त्यांचा मृत्यू झाला.

चाकण पोलीस ठाण्यात याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. चाकण पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.