Chakan: दोन गटांतील हाणामारी प्रकरणी 13 जणांवर दरोड्याच्या प्रयत्नाचा तर 6 जणांवर खुनाच्या प्रयत्नाचा गुन्हा

Chakan: After a clash between two groups, the offence of attempt to robbery on 13 persons, while attempting murder case registered against 6 persons

एमपीसी न्यूज – दोन दिवसांपूर्वी दोन गटात झालेल्या तुंबळ हाणामारी प्रकरणी चाकण पोलीस ठाण्यात परस्परविरोधी तक्रारी दाखल करण्यात आल्या आहेत. दरोड्याचा प्रयत्न आणि खुनाचा प्रयत्न असे अत्यंत गंभीर गुन्हे नोंदविण्यात आले आहेत. या संपूर्ण घटनेत नावे निष्पन्न झालेल्या 11 जणांसह अन्य सात ते आठ जणांवर गुन्हे दाखल करण्यात आल्याची माहिती समोर येत आहे. या घटनेबाबत तपास अधिकाऱ्यांनी घटना घडल्या पासून माध्यमांनी वेळोवेळी विचारणा केल्यानंतरही माहिती देण्यास टाळाटाळ केली होती.

गुन्हे दाखल झालेल्यांमध्ये राजकीय पक्षांचे वजनदार पदाधिकारी, एक नगरसेवक, एक माजी सरपंच अशा पदाधिकाऱ्यांचा समवेश असल्याची बाब समोर येत आहे. दरम्यान या वादात दोन जन गंभीर जखमी आहेत; तर काही जण किरकोळ जखमी असून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरु असल्याची माहिती समोर येत आहे.

चाकणपासून जवळच असलेल्या एका मळ्यात हा गंभीर वादाचा प्रकार घडला आहे. घटनेनंतर पोलिसांत एकमेकांच्या विरोधात गंभीर तक्रारी दाखल झाल्यानंतर यातील निष्पन्न झालेल्या संशयित आरोपींनी पलायन केले आहे. दरम्यान या धक्कादायक घटनेत केवळ एकाच बाजूचा गुन्हा दाखल व्हावा यासाठी जोरदार राजकीय प्रयत्न झाले. मात्र यातील धक्कादायक वस्तुस्थिती समोर आल्यानंतर पोलीस प्रशासनाने दोन्ही कडील तक्रारी घेऊन सुमारे तेरा जणांवर दरोड्याचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तर सुमारे सहा जणांवर खुनाचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

दरम्यान रविवारी रात्री प्राप्त झालेल्या माहितीनुसार पोलिसांनी दोन्हीकडील तक्रारी दाखल केल्याने मोठ्या प्रमाणावर राजकीय वजन वापरल्याने काही वरिष्ठ अधिकाऱ्यांना सक्तीच्या रजेवर जावे लागणार असल्याची जोरदार चर्चा आहे. त्यामुळे दोन गटातील या अत्यंत टोकाच्या वादात न्यायाची भूमिका घेणाऱ्या मंडळींवरच अन्याय होत असल्याची जनभावना आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.