Chakan : आदर्श गावच्या आदर्श सरपंचांचा पितृप्रेम अन् पर्यावरण रक्षणाचा आदर्श

एमपीसी न्यूज – वडिलांच्या संस्कारांमधून आदर्श मूल्यांची (Chakan) रुजवण झाली. ती मूल्ये गावच्या विकासात आणि पर्यावरण रक्षणाच्या कामात अंगिकारून आदर्श सरपंच म्हणून बहुमान मिळवत आदर्श गाव बनवले. वडिलांच्या मृत्यू नंतर रक्षा नदीत विसर्जित न करता वड आणि पिंपळ अशी झाडे लावून त्या झाडांना रक्षा टाकून झाडांच्या संगोपनाची जबाबदारी घेतली. ती झाडे जसजशी मोठी होतील तसतसा वडिलांच्या संस्कारांचा आधारवड मोठ्ठा होईल आणि समाजाला प्रेरणा देईल. रक्षा नदीत विसर्जित न केल्याने नदी प्रदूषण देखील होणार नाही. हा उपक्रम खेड तालुक्यातील आदर्श गाव कान्हेवाडी तर्फे चाकणचे आदर्श सरपंच भाऊसाहेब तथा नवनाथ पवार आणि त्यांच्या बंधुंनी राबविला.

सरपंच पवार यांचे वडील एकनाथ पवार यांचे वृद्धापकाळाने निधन झाले. वडीलांच्या संस्कारांतून आम्ही घडलो. त्यांच्या संस्कार आणि शिकवणीतून समाजकार्याची आवड आहे. त्यांच्या आशीर्वादाने जनतेची सेवा करण्याची संधी मिळाली. वडिलांच्या प्रती असलेल्या श्रद्धेतूनच त्यांच्या स्मृतीचे जतन करण्याचा हा प्रयत्न असल्याच्या भावना सरपंच पवार यांनी व्यक्त केल्या.

कान्हेवाडी तर्फे चाकण गावाने आतापर्यंत ग्राम स्वच्छता, सांडपाणी व्यवस्थापन, वृक्षारोपण व संवर्धन, घनकचरा व्यवस्थापन,आरोग्य सुविधा,पिण्याचे पाणी व्यवस्था अशा विविध विकास कामांबाबत राज्य व राष्ट्रीय पातळीवर अनेक पुरस्कार पटकावून मॉडेल गावाचा दर्जा प्राप्त केला आहे. गावाजवळून वाहणारी इंद्रायणी नदीचा प्रवाह स्वच्छ ठेवण्याचा प्रयत्न केला जात आहे. त्यासोबतच अंत्यविधीचे रक्षाविसर्जन नदी पात्रात करण्याची परंपरा थांबवणे कठीण आहे. कारण ही रूढी परंपरा भावनिक आहे. नदीचे पावित्र्य व स्वच्छता राखण्यासाठी नदीपात्रात (Chakan) रक्षाविसर्जन न करण्याची इच्छा कृतीत आणण्यासाठी स्वत:च्या घरापासून सुरुवात केली. अशी प्रतिक्रिया सरपंच भाऊसाहेब पवार यांनी व्यक्त केली.

घरामधील चुलीतील राख आपण खत म्हणून शेतात टाकतच असतो. म्हणून गावांगावांमधून या उपक्रमाचे अनुकरण करावे. म्हणजे नदीचे पाणी दुषित होणार नाही. व वृक्षांना खत मिळेल असे आवाहन पवार यांनी केले.

रक्षा विसर्जन विधीसाठी नातेवाईक, हितचिंतक, भावकी, गावकी व परिसरातील ग्रामस्थ मोठ्या संख्येने आले होते. त्यांच्या उपस्थितीत सरपंच भाऊसाहेब पवार, बंधू दत्तात्रय पवार, कैलास पवार, संभाजी पवार, शिवाजी पवार यांनी कै. एकनाथ पवार यांच्या स्मृतीप्रित्यर्थ स्मशान भूमी जवळच वड व पिंपळ या देशी झाडांची लागवड केली. रक्षा विसर्जनाची राख त्या झाडांना खत म्हणून घातली. या वृक्षांच्या संगोपनाची जबाबदारी ही पवार कुटुंबियांनी घेतली आहे. अशाप्रकारे वृक्षारोपण व रक्षा विसर्जन उपक्रमाने वडिलांची स्मृती कायम राहाणार असल्याचे सांगितले.

त्यांचे पश्चात पत्नी तीन मुलगे, चार मुली, तीन बहिणी, पुतणे, नातवंडे, पतवंडे असा मोठा परिवार आहे. माजी राज्यमंत्री संजय तथा बाळा भेगडे यांचे ते आजोबा होत.

Chinchwad Result : चिंचवड पोटनिवडणुकीत कोणाला मिळाली किती मते? जाणून घ्या उमेदवारांच्या मतांची टक्केवारी…

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.