Chakan : बेकायदेशीररीत्या पिस्तूल बाळगल्याप्रकरणी तरुणाला अटक; दोन पिस्तूल जप्त

एमपीसी न्यूज – बेकायदेशीररीत्या पिस्तूल बाळगल्याप्रकरणी पिंपरी-चिंचवड गुन्हे शाखा युनिट तीनच्या पोलिसांनी एका तरुणाला अटक केली. त्याच्याकडून दोन पिस्तूल आणि चार काडतुसे जप्त करण्यात आले आहेत.

गणेश श्रीमंत चव्हाण (वय 23, रा. देहूगाव) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. याप्रकरणी गुन्हे शाखा युनिट तीनचे पोलीस शिपाई सागर बाळासाहेब जैनक यांनी चाकण पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, चाकण परिसरात गस्त घालत असताना पोलीस शिपाई सागर जैनक यांना माहिती मिळाली की, एक तरुण खेड येथील भांबोली चौकात पिस्तूल विक्रीसाठी येणार आहे. त्यानुसार, पोलिसांनी भांबोली फाटा ते शिंदेगावच्या रोडवर सापळा रचून गणेश चव्हाण याला ताब्यात घेतले. त्याची झडती घेतली असता त्याच्याकडे दोन देशी बनावटीचे पिस्तूल आणि चार जिवंत काडतुसे मिळून आली. आरोपी गणेश याच्याकडून एकूण 82 हजारांचा ऐवज जप्त करून त्याला अटक केली आहे. त्याच्यावर भारतीय शस्त्र अधिनियम आणि महाराष्ट्र पोलीस कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

ही कारवाई पोलीस आयुक्त संदीप बिष्णोई, अपर पोलीस आयुक्त रामनाथ पोकळे, उपायुक्त सुधीर हिरेमठ, सहाय्यक आयुक्त राजाराम पाटील, सहाय्यक आयुक्त श्रीधर जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक डॉ. विवेक मुगळीकर, सहाय्यक पोलीस निरीक्षक सतीश कांबळे, पोलीस कर्मचारी विठ्ठल सानप, गंगाधर चव्हाण, हजरत पठाण, दादा पवार, सचिन मोरे, योगेश्वर कोळेकर, यदु आढारी, जमीर तांबोळी, त्रिनयन बाळसराफ, राजकुमार हनुमंते, सागर जैनक, महेश भालचिम यांच्या पथकाने केली.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.