Chakan : एटीएम सेंटरमध्ये नागरिकांची फसवणूक करणारा गजाआड

आरोपीवर नवी मुंबईत नऊ वेगवेगळे गुन्हे दाखल ; आठ एटीएम कार्ड हस्तगत

एमपीसी न्यूज- एटीएम सेंटरमध्ये घुसून नागरिकांची हातोहात फसवणूक करणाऱ्या चोरट्यास चाकण पोलिसांनी जेरबंद केले आहे. त्याने चाकणसह नवी मुंबई व ठाणे परिसरात गुन्हे केल्याचे समोर आले आहे. त्याच्याकडून आठ एटीएम कार्ड हस्तगत करण्यात आले आहेत.

विकी पंडीत साळवे (वय २७ वर्षे रा. उल्हास नगर जि. ठाणे ) असे या प्रकरणी ताब्यात घेण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. त्याच्यावर नवी मुंबई व ठाणे परिसरातील पोलीस ठाण्यांमध्ये नऊ गुन्हे दाखल असल्याचे समोर आले आहे.

याबाबतची माहिती अशी की, महाळुंगे गावच्या हद्दीत एच पी पंपासमोरील आयसीआयसी बँकेच्या एटीएममध्ये मंगळवारी (दि.18) सुफीयान अब्दुल हकीम खान (वय 23 वर्षे रा.चिखली पुणे) हे पैसे काढण्यासाठी गेले असताना अनोळखी इसम त्यांच्या बाजुला उभा राहिला. त्यावेळी फिर्यादी यांनी त्यांचे एटीएम दोन वेळा स्वॅप केले असता पैसे निघाले नाहीत. त्यामुळे सुफीयान एटीएमचे बाहेर येऊन उभे राहिले.

त्यावेळी सदर अनोळखी इसमाने सुफीयान यांस ‘माझ्याकडे 1 लाख 40 हजार रूपये आहेत. माझे पैसे गावाला पाठवायचे आहेत. तू तुझ्या खात्यावरून पाठव. असे म्हणत त्याच्या जवळील रूमालामध्ये गुंडाळलेले पैशांचे नोटांचे बंडलच्या आकाराची एक गड्डी सुफीयानच्या हातात देऊन फिर्यादीचा विश्वास संपादन केला.

‘एटीएम मधुन पैसे निघत नाहीत काय ? मी पैसे काढुन देतो’ असे म्हणुन सुफीयानच्या हातातील एटीएम कार्ड घेऊन पसार झाला. दुस-या एटीएममध्ये जाऊन सुफीयानच्या एटीएम कार्डवरून दोन वेळा एकुण 19 हजार 900 रुपये काढले. सुफीयान यांनी त्यांच्या हातातील बंडल पाहिला असता त्यामध्ये नोटांच्या आकाराचे कागदाचे पुडके आढळून आले.

त्यावरून सुफीयान यांना त्यांची फसवणूक झाल्याचे समजल्याने त्यांनी चाकण पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. चाकण पोलीसांनी सदर गुन्हयातील फिर्यादी सुफीयान यांना सोबत घेऊन चाकण पोलीस ठाणे परिसरात आरोपीचा शोध घेतला असता तोच इसम खराबवाडी (ता. खेड) येथे थांबलेला दिसला. त्याला ताब्यात घेऊन चौकशी केली असता त्याचे नाव विकी पंडीत साळवे असल्याचे समजले.

आरोपीच्या अंगझडतीमध्ये दाखल गुन्हयातील फिर्यादीचे फसवुन नेलेले एटीएमकार्ड व एटीएम कार्डव्दारे काढलेले 19 हजार 900 रुपये तसेच इतरही वेगवेगळया बँकांचे 8 एटीएम कार्ड आढळून आले आहे. त्वरित आरोपी साळवे याला अटक करण्यात आली. विकी पंडीत साळवे याच्यावर यापुर्वी अशाच प्रकारे नवी मुंबई व ठाणे परिसरातील पोलीस ठाण्यात सुमारे 9 गुन्हे दाखल आहेत. त्याच्याजवळ आढळून आलेले एटीएम कार्ड नवी मुंबई, ठाणे परिसरातील फसवणूक केलेल्या नागरिकांचे असल्याचे तपासात निष्पन्न झाले.

सदरची कारवाई पोलीस आयुक्त आर. के. पदनाभन, अपर पोलीस आयुक्त मकरंद रानडे, पोलीस उपायुक्त स्मार्तना पाटील, सहा. पोलीस आयुक्त चंद्रकांत अलसटवार यांचे सुचना व मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुनिल पवार, पोलीस उप निरीक्षक संजय निलपत्रेवार, शिवानंद स्वामी, संजय जरे, संदीप सोनवणे, हनुमंत कांबळे यांनी केलेली असून सदर गुन्हयाचा पुढील तपास पोलीस चाकण पोलीस करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.