Chakan : जातीवाचक बोलून हिनतेची वागणूक दिल्याप्रकरणी चाकण नगरपरिषदेच्या नगराध्यक्षांकडून ॲट्रॉसिटीची फिर्याद

एमपीसी न्यूज – चाकण नगरपरिषदेतील एका पदाधिकारी महिलेने नगरपरिषदेच्या नगराध्यक्षांना जातीवाचक बोलून अपमानास्पद वागणूक दिली आहे. याबाबत नगराध्यक्षांनी पदाधिकारी महिलेवर ॲट्रॉसिटीचा गुन्हा नोंदवला आहे. ही घटना 29 मे 2018 ते 11 मे 2020 या काळात चाकण नगरपरिषद कार्यालय आणि चाकणमधील सार्वजनिक ठिकाणी घडली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी हे महार समाजाचे असून ते चाकण नगरपरिषदेचे नगराध्यक्ष आहेत. नगराध्यक्ष यांनी त्यांच्या फिर्यादीत म्हटले आहे की, फिर्यादी यांनी केलेल्या सामाजिक कामाची अवहेलना करून आरोपी महिलेने वेळोवेळी जातीवरून व त्यांच्या समाजाबाबत बोलून शाब्दिक हिनतेची व अपमानाची वागणूक दिली. नगरपरिषदेच्या सभेमध्ये ‘तुम्हाला काही कळत नाही, तुम्हाला तेवढी अक्कल नाही,’ असे बोलून अपमानीत केले.

तसेच आरोपी महिलेने ‘तुमची साधी सभापती होण्याची औकात नाही, तुम्ही महार असल्याने आरक्षणामुळे नगराध्यक्ष झालात. हे तुमच्या समाजाचे कामच नाही’ असे लोकांसमोर बोलून फिर्यादी यांना अपमानित केले. मागील काही दिवसांपूर्वी फिर्यादी हे पास मिळविण्यासाठी आरोपी महिलेच्या दालनात जमिनीवर बसले होते. त्यावेळी ‘तुमच्या समाजाची हीच जागा आहे’, असे आरोपी महिलेने म्हटले.

तसेच कळूसकडे जाणाऱ्या सार्वजनिक रस्त्यावर जमलेल्या लोकांसमोर ‘तुमच्या महार समाजाला कोणी घाबरणार नाही, तुमच्या समाजाचे काम नाही. तुम्ही येथून निघून जा’ असे म्हणून फिर्यादी यांना अपमानित केले असल्याचेही नगराध्यक्ष यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे. सहाय्यक पोलीस आयुक्त राम जाधव तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
You might also like