Chakan : साईबाबा पतसंस्थेच्या मतपत्रिका पोलीस बंदोबस्तात ट्रेझरीत रवाना

एमपीसी न्यूज : साईबाबा ग्रामीण बिगरशेती पतसंस्थेच्या (Chakan) निवडणुकीतील धांदली चाकण पोलिसांनी जप्त केलेल्या मतपत्रिका पोलीस बंदोबस्तात सहकार विभागाच्या माध्यमातून तहसील कार्यालयातील ट्रेझरीमध्ये रवाना करण्यात आल्या.

यावेळी मोठा पोलीस बंदोबस्त होता. चाकण पोलिसांत या प्रकरणी  फसवणुकीसह विविध कलमानुसार गुन्हा दाखल करण्यात आला असून तपास सुरु आहे. जप्त केलेल्या बोगस मतपत्रिका अद्यापही पोलिसांच्या ताब्यात असून अन्य सीलबंद मतपेट्यांमधील मतपत्रिका राजगुरुनगर येथील ट्रेझरी मध्ये अत्यंत कडेकोट सुरक्षेत पाठवण्यात आल्या. यावेळी चाकण पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक वैभव शिंगारे स्वतः उपस्थित होते.

साईबाबा ग्रामीण बिगरशेती पतसंस्थेच्या निवडणुकीतील धांदली प्रकरणी चाकण पोलिसांत फसवणुकीसह विविध कलमानुसार चाकण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. रविवारी (दि. 30 एप्रिल) रात्री उशिरा हा गुन्हा दाखल करण्यात आला असल्याची माहिती चाकण पोलीस ठाण्याच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिली.

साईबाबा ग्रामीण बिगरशेती पतसंस्थेसाठी रविवारी ( दि. 23 एप्रिल  रोजी) चाकण (ता. खेड) येथील श्री शिवाजी विद्यालयात मतदान झाले. मात्र सायंकाळी मतमोजणी सुरु झाल्यानंतर प्रत्येक प्रवर्गातील मतदानाचा शिक्का मारलेल्या बोगस मतपत्रिका येथे आढळून आल्या होत्या. संपूर्ण मतदान आणि मतमोजणी प्रक्रिया (Chakan) प्रशासनाला हाताशी धरून बोगस पद्धतीने राबवण्यात आल्याची बाब समोर आली.

Ashadhi Wari : आषाढीवारी काळात विविध सुविधांसाठी कंट्रोल रूम उभारणार – गोविंद शिंदे

त्यानंतर मतमोजणी थांबवण्यात आली. पोलिसांनी बॅगमधून आलेल्या बोगस आणि अन्य सीलबंद मतपत्रिका पंचनामा करून जप्त केल्या होत्या.

साईबाबा पतसंस्था पंचवार्षिक निवडणुकीचे निवडणूक निर्णय अधिकारी एस.एम. धादवड यांनीच या प्रकरणी चाकण पोलिसांत वरिष्ठांच्या आदेशानुसार गुन्हा दाखल केला होता. या प्रकरणात पोलिसांनी अनेकांची चौकशी केली आहे. या बोगस मतपत्रिका प्रकरणी आर्थिक तडजोडी आणि मतदान केंद्रावर थांबून काही कॅमरे मुद्दाम बंद करणारे, बोगस मतपत्रिका मतमोजणीच्या ठिकाणी आणणारे व ही संपूर्ण यंत्रणा मतदान स्थळी थांबून राबवणारे अशा सर्वांचा तपास चाकण पोलीस करत आहेत.

या प्रकरणाचा तपास करणारे चाकण पोलीस ठाण्याच्या गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अनिल देवडे यांची अचानक बदली झाली. त्यामुळे चाकण पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक वैभव शिंगारे स्वतः या प्रकरणाचा तपास करत आहेत.
चाकणचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक वैभव शिंगारे यांनी सांगितले कि, साईबाबा पतसंस्थेच्या निवडणुकीत झालेल्या आक्षेपार्ह प्रकारानंतर मतपत्रिका जप्त करण्यात आल्या होत्या. सहकार विभागाकडे मतपत्रिका सुरक्षित ठेवण्याची व्यवस्था नसल्याने पोलीस ठाण्यात ठेवण्यात आल्या होत्या. आता त्या सहकार विभागाकडे देण्यात आल्या आहेत. या प्रकरणाचा तपास सुरु आहे.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.