Chakan : कंटेनरच्या धडकेत दुचाकीस्वाराचा मृत्यू

एमपीसी न्यूज – समोरून येणाऱ्या दुचाकीला भरधाव वेगात जाणाऱ्या कंटेनरने धडक दिली. यामध्ये दुचाकीस्वाराचा मृत्यू झाला. हा अपघात 22 जून रोजी सकाळी सहाच्या सुमारास चाकण-तळेगाव रस्त्यावर तुळवे वस्ती येथे घडला.

सुदाम दादाभाऊ गावडे (वय 30, रा. इंदोरी, ता. मावळ) असे मृत्यू झालेल्या दुचाकीस्वाराचे नाव आहे. याप्रकरणी कंटेनरचालक ज्ञानेश्वर सुभाष गवळी (वय 30, रा. आळंदी देवाची) याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. चाकण पोलिसांनी या प्रकरणी फिर्याद नोंदवली.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, 22 जून रोजी सकाळी सहाच्या सुमारास सुदाम गावडे त्यांच्या मोटारसायकलवरून (एम एच 14 / ए एक्स 2832) चाकणकडे जात होते. ते तुळवे वस्ती येथे आले असता चाकणकडून तळेगावकडे भरधाव वेगात जाणाऱ्या कंटेनरने (एम एच 23 / ए यू 1496) गावडे यांच्या दुचाकीला समोरून धडक दिली. या अपघातात गावडे गंभीर जखमी झाले. तसेच त्यांच्या दुचाकीचे देखील मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. कंटेनर चालक ज्ञानेश्वर गवळी घटनास्थळी न थांबता पळून गेला. याबाबत गुन्हा दाखल करण्यात आला असून चाकण पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.