Chakan : अंधत्वावर मात करून दीपकने प्राप्त केले वाद्य वादनावर प्रभुत्व

कुठलाही गुरु नसताना वाजवतो हार्मोनियम आणि तबला

(अविनाश दुधावडे)

एमपीसी न्यूज- कोणतेही शारीरिक व्यंग असले तरी मनात जिद्द असेल तर कशावरही मात करता येते याचा प्रत्यय अंध असलेल्या वीस वर्षाच्या युवकाने समाजाच्या समोर ठेवला आहे. दीपकने अंधत्वावर मात करून टीव्ही आणि रेडिओवर संगीत एकूण कुठल्याही गुरुशिवाय स्वतःच स्वतःचा गुरू होत हार्मोनियम, तबला अशी वाद्य बिनचूक वाजवत आहे. अंधत्वावर मात करत स्वतःचे स्वावलंबी प्रकाशमान आयुष्य जगणाऱ्या दीपकची ही कला चाकण मधील नागरिकांत चर्चेचा विषय ठरली आहे.

जन्मतःच अंधत्व पदरी पडलेले असले तरी जिद्दीच्या बळावर त्यावर मात करून स्वत:ला सिद्ध करता येऊ शकते, याचा वस्तुपाठच चाकण येथील दीपक घनश्याम घोगरे या अंध मुलाने घालून दिला आहे. उपजत कलागुणांना पैलू पाडून नैसर्गिक अंधत्वावर त्याने एक प्रकारे मात केली आहे. दीपक घोगरे याची घरची परिस्थिती बेताची आहे. जन्मजात दृष्टीहीन असलेल्या दीपकला दूरचित्रवाणी (टीव्ही) आणि रेडिओवर संगीत ऐकण्याचा छंद जडला. अशातच त्याने आपल्या आई-वडिलांकडे हार्मोनियम आणि तबला याची मागणी केली.

मुलाची संगीताची आवड ओळखून पालकांनी त्याच्यातील उपजत कलागुणांना वाव मिळावा म्हणून त्याला वाद्य आणून दिली. कानावर पडणारे संगीत दीपक वाद्यांच्या माध्यमातून तंतोतंत वाजवायला शिकला आहे. त्याच्या या कलेला परिसरातील नागरिक दाद देत आहेत. मनावर घेतले तर जगात कोणतीच गोष्ट अशक्य नाही, असेच दीपकने कृतीतून दाखवून दिले आहे. तिच्या या नेत्रदीपक कौशल्याचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे. जन्मजात दृष्टीहीन असलेल्या अपंगत्त्वावर मात करून जीवनाचे रडगाणे न गाता संगीत आणि गाण्यातून आनंदमय जीवन जगणाचा दीपकचा हा प्रयत्न डोळे असणाऱ्या लोकांना संघर्षासाठी नवी उमेद देणारी आहे एवढे मात्र नक्की.

आपल्या कलेविषयी दीपक म्हणाला, ” लहानपानापासून कानावर पडणाऱ्या संगीताची गोडी लागली. त्यातून सुरुवातीला घरातील भांडी वाजवत असे. आई वडिलांकडे हट्ट केल्यानंतर त्यांनी तबला, हार्मोनियम अशी वाद्य खरेदी करून दिली त्यामुळे माझी कला जोपासणे शक्य होऊ शकले” दरम्यान मराठी हिंदी, बातम्यांच्या सोबतच तेलगु, गुजराती, बंगाली बातम्या दूरचित्रवाणीवर ऐकून त्या भाषाही बोलता येत असल्याचे दीपकने आवर्जून सांगितले.

दीपकचे वडील घनश्याम घोगरे व आई शालन घोगरे म्हणाले की, दीपकला दृष्टी मिळावी यासाठी अनेक रुग्णालये गाठली. मात्र जन्मजात दृष्टीहीन असल्याने त्याच्यावर काहीही इलाज करणे अशक्य असल्याचे सर्वच डॉक्टरांनी सांगितले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.