Chakan : कंपनीतील स्पेअर पार्ट चोरणा-या दोघांना अटक

नऊ लाखांचा ऐवज जप्त; चाकण पोलिसांची कामगिरी

एमपीसी न्यूज – ज्या कंपनीमध्ये सुरक्षा रक्षक म्हणून काम केले त्याच कंपनीत काही कालावधीनंतर चोरी केली. ही घटना चाकण येथे कुरुळी येथे के एस एच लॉजिस्टिक वेअर हाऊस येथे घडली. याप्रकरणी चाकण पोलिसांनी दोघांना अटक केली आहे. त्यांच्याकडून 9 लाख 10 हजार 46 रुपयांचा ऐवज जप्त करण्यात आला आहे.

बिरेंद्र गंगाधर यादव (वय 45, रा. येवलेवाडी, ता. हवेली), संतोष अशोक कुमावत (वय 43, रा. देहूगाव, ता. हवेली) अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत. याप्रकरणी महाले वेअर इंडिया प्रा. लि. कंपनीचे व्यवस्थापक योगेश संभाजीराव फडतरे ( वय 30, रा. सारा ऑर्चिड, तळेगाव रोड चाकण ) यांनी चाकण पोलीस ठाण्यात फिर्याद दिली होती.

वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुनील पवार यांनी दिलेल्या माहितीनुसार, उघड्या शटरमधून महाले वेअर इंडिया प्रा. लि. कंपनीच्या कुरुळी येथील के एस एच लॉजिस्टिक वेअर हाऊस मधून 125 कॉम्प्रेसर पार्ट चोरी झाले. हा प्रकार 1 सप्टेंबर ते 1 डिसेंबर या कालावधीत घडला. याबाबत व्यवस्थापक योगेश फडतरे यांनी चाकण पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. या गुन्ह्याचा तपास करत असताना पोलीस उपनिरीक्षक विक्रम पासलकर याना माहिती मिळाली की, हा गुन्हा बिरेंद्र आणि संतोष या दोघांनी केला आहे. ते दोघे चाकण एमआयडीसी येथील स्पायसर चौकात येणार आहेत. त्यानुसार पोलिसांनी स्पायसर चौकात सापळा रचून दोघांना ताब्यात घेतले. त्यांच्याकडे चौकशी केली असता त्यांनी ही चोरी केल्याचे कबुल केले. त्यांच्याकडून एकूण 9 लाख 10 हजार 46 रुपयांचे कॉम्प्रेसर पार्ट आणि एसी कंट्रोल पॅनल जप्त करण्यात आले.

आरोपी संतोष कुमावत हा स्पेअरपार्ट खरेदी करून त्याची विक्री करीत होता. तर आरोपी बिरेंद्र यादव हा महाले वेअर इंडिया प्रा. लि. कंपनीमध्ये मागील काही दिवसांपूर्वी सुरक्षा रक्षक म्हणून काम करत होता. चाकण पोलिसांनी या महिन्यात स्पेअर पार्ट चोरी करणा-या दोन गॅंगना अटक केली आहे. दोन्ही गॅंगमधील आरोपी ज्या कंपनीत सुरक्षा रक्षक म्हणून काम करत होते, त्याच कंपनीत त्यांनी चोरी केली. त्यामुळे खाजगी सुरक्षा एजन्सी नेमताना त्या एजन्सीचे पोलीस व्हेरिफिकेशन झाले असल्याची खात्री करावी, असे आवाहन पोलिसांकडून करण्यात आले आहे.

ही कामगिरी पोलीस आयुक्त आर के पद्मनाभन, अप्पर पोलीस आयुक्त मकरंद रानडे, पोलीस उपायुक्त स्मार्तना पाटील, सहाय्य्क पोलीस आयुक्त चंद्रकांत अलसटवार यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुनील पवार, पोलीस निरीक्षक सुनील दहिफळे, पोलीस उपनिरीक्षक विक्रम पासलकर, पोलीस कर्मचारी सुरेश हिंगे, शिवेंद्र स्वामी, संपत मुळे, संदीप सोनवणे, मछिंद्र भांबुरे यांच्या पथकाने केली.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.