Chakan : बेकायदेशीर पिस्तूल बाळगल्याप्रकरणी दोघांना अटक; दोन पिस्तूल, चार काडतुसे जप्त

एमपीसी न्यूज – बेकायदेशीर पिस्तूल बाळगल्याप्रकरणी गुन्हे शाखा युनिट एकच्या पथकाने दोन तरुणांना अटक केली. त्यांच्याकडून दोन देशी बनावटीचे पिस्तूल आणि चार जिवंत काडतुसे जप्त करण्यात आली आहेत.

अमर राजकुमार राठोड (वय 22, रा. शिक्षक कॉलनी, मेदनकरवाडी, चाकण), अतुल तानाजी भोसले (वय 24, रा.म्हाळुंगे इंगळे, ता. खेड) अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत.

वरिष्ठ पोलीस निरीक्षक उत्तम तांगडे यांनी दिलेल्या माहितीनुसार, चाकण परिसरात गस्त घालत असताना गुन्हे शाखेचे पोलीस शिपाई गणेश सावंत यांना माहिती मिळाली की, निळा शर्ट व निळी जिन्स घातलेला तरुण मेदनकरवाडीच्या कमानीजवळ येणार आहे. त्याच्याजवळ पिस्तूल आहे. या माहितीनुसार मेदनकरवाडी कमानीजवळ पोलिसांनी सापळा रचून अमर राठोड याला ताब्यात घेतले. त्याची अंगझडती घेतली असता त्याच्याजवळ एक देशी बनावटीचे पिस्तूल आणि दोन जिवंत काडतुसे असा ऐवज मिळून आला. त्यानुसार त्याला अटक करण्यात आले.

दुस-या एका कारवाईमध्ये चाकण परिसरात गस्त घालत असताना गुन्हे शाखेचे पोलीस शिपाई प्रवीण पाटील यांना माहिती मिळाली की, श्रीपती बाबा पादुका समाधीजवळ एक तरुण पिस्तूल विक्रीसाठी येणार असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार त्या ठिकाणी सापळा रचून दुसरा आरोपी अतुल भोसले याला ताब्यात घेतले. त्याची अंगझडती घेतली असता त्याच्याजवळ एक देशी बनावटीचे पिस्तूल आणि दोन जिवंत काडतुसे आढळून आली. दोन्ही प्रकरणांमध्ये चाकण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

ही कामगिरी पोलीस आयुक्त आर के पद्मनाभन, अप्पर पोलीस आयुक्त मकरंद रानडे, सहायक पोलीस आयुक्त सतिश पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली युनिट एकचे वरीष्ठ पोलीस निरीक्षक उत्तम तांगडे, सहायक पोलीस निरीक्षक गणेश पाटील, उपनिरीक्षक काळुराम लांडगे, सहायक फौजदार रविंद्र राठोड, हवालदार प्रमोद लांडे, पोलीस नाईक सचिन उगले, पोलीस शिपाई प्रविण पाटील, गणेश सावंत यांच्या पथकाने केली.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.