Chakan : कचऱ्याच्या घंटागाडीत आढळला तुटलेला हाताचा पंजा!

एमपीसी न्यूज – चाकण नगरपरिषदेच्या वतीने घरोघरी जाऊन संकलित करण्यात येणाऱ्या एका कचऱ्याच्या एका पिशवीत चक्क तुटलेला आणि रक्ताळलेला हाताचा पंजा मिळून आल्याने खळबळ उडाली आहे. याबाबत चाकण पोलीस ठाण्यात तक्रार देण्यात आली आहे. चाकण पोलिसांनी या घटनेची गांभीर्याने दखल घेतली असून शहरातील सर्व कचराकुंड्या आणि बिरदवडी येथील खाणीतील डम्पिंग ग्राउंडवर टाकण्यात आलेल्या सर्व कचऱ्याची तपासणी नगरपरिषदेने करण्याच्या सूचना दिल्या आहेत.

घंटागाडी चालक दतात्रेय मुकुंद गायकवाड (वय ३१, रा. वाकी, ता. खेड) यांनी चाकण पोलिसांत तक्रार दिली आहे.

  • याबाबत मिळालेली अधिक माहिती अशी, चाकण नगरपरिषदेच्या वतीने शहरात घरोघरी तयार होणारा कचरा नगरपरिषदेच्या वतीने घंटागाडीतून गोळा केला जातो. चाकण चाकण नगरपरिषद अस्तित्वात आल्यापासून या पद्धतीने कचरा गोळा केला जात आहे. शुक्रवारी येथील प्रभाग क्रमांक १८ मध्ये दतात्रेय गायकवाड यांनी आपली कचरा उचलण्याची घंटागाडी (एमएच १४ ई ए ७३७५) नेमून दिलेल्या प्रभाग क्रमांक १८ मध्ये नेली.

नेहमीप्रमाणे या प्रभागातील माळआळी, बाजारपेठ आणि परिसरात घरोघरी जाऊन कचरा गोळा केल्यानंतर घंटागाडी कचऱ्याने भरल्याने खाली करण्यासाठी बिरदवडी येथील खाणीत नेली. या वाहनातील कचरा खाली करताना पिशवीत बांधलेला मनुष्याच्या हाताचा पंजा दिसला. या पंजाला रक्त लागले असून तो सुकलेला अवस्थेत असल्याचे निदर्शनास आले.

  • याप्रकरणी चाकण पोलिसांत तक्रार देण्यात आली आहे. पोलिसांनी बिरदवडी येथील घटनास्थळी जाऊन पहाणी केली आहे. चाकणचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुनील पवार यांनी सांगितले कि, चाकणमधील अन्य कचऱ्याची ठिकाणे तपासण्याच्या सूचना चाकण नगरपरिषदेला देण्यात आल्या आहेत. पोलिसांनी याबाबत तपास गांभीर्याने सुरु केला आहे.

दरम्यान, हा हाताचा पंजा नेमका कुठून आला? यामागचे गौडबंगाल काय? हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. या भागात काही खासगी रुग्णालये असून तेथून हा मनुष्य जातीचा हाताचा पंजा कचऱ्यात आला आहे काय?, याचाही पोलीस शोध घेत आहेत.

चाकण : येथे घरोघरी जाऊन संकलित करण्यात आलेल्या कचऱ्यात मिळून आलेला हाताचा तुटलेला पंजा.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.