Chakan : नोकरीच्या शोधात आला अन् दोन्ही पाय गमावून बसला; दोन कंटेनरच्या अपघातात सापडला युवक

एमपीसी न्यूज – नोकरीच्या शोधात चाकणमध्ये आलेल्या तरुणाला दोन कंटेनरच्या धडकेत आपले दोन्ही पाय गमवावे लागल्याची धक्कादायक घटना चाकण (ता. खेड) येथे बुधवारी (दि.२६) पहाटे तीनच्या सुमारास पुणे-नाशिक राष्ट्रीय महामार्गावर तळेगाव चौक येथे घडली. केवळ नशीब बलवत्तर म्हणून त्याच्या सोबत असलेले अन्य चार ते पाच मित्र या अपघातातून बचावले.

वैभव अशोक आहिरे ( वय २०, रा. सटाणा जि. नाशिक ) असे या अपघातात दोन्ही पाय गमावलेल्या तरुणाचे नाव आहे.

याबाबत मिळालेली माहिती अशी कि, वैभव आणि त्याचे मित्र सटाणा येथून नोकरीच्या शोधात चाकणमध्ये आले होते. पहाटे ते चाकणमध्ये तळेगाव चौक येथे पोहचले. पुणे नाशिक महामार्गाने आणि तळेगाव चाकण मार्गाने जाणारा कंटेनर (एम एच ४६ ए एफ ३२५०) आणि (एम एच ०४ टी यु १११६) दोन कंटेनरची चाकणमधील तळेगाव चौकात चौक ओलांडून पुढे जाण्याच्या प्रयत्नात असताना जोरदार धडक झाली. तळेगाव चौकात पोलीस चौकीजवळ उभा असलेला वैभव या अपघातात सापडला. त्याचे दोन्ही पाय शरीरापासून वेगळे झाले. त्याचे अन्य मित्र तत्काळ बाजूला पळण्यात यशस्वी झाल्याने या अपघातातून थोडक्यात बचावले. यातील एक कंटेनर पोलीस चौकीच्या पायर्यांवर आदळला. त्यामुळे चौकीचेही नुकसान झाले.

तत्काळ येथील रुग्णवाहिका चालकांनी प्रसंगावधान राखत जखमी युवक आणि शरीरापासून वेगळे झालेले दोन्ही पाय घेऊन जवळील रुग्णालयात धाव घेतली. मोठा रक्तस्राव होऊनही तत्काळ रुग्णालयात आणण्यात आल्याने संबंधित तरुणाचे प्राण वाचले असून दोन्ही पाय गेल्याने त्याला कायमचे अपंगत्व आले आहे. नोकरीच्या शोधात आलेल्या युवकाचा हा अत्यंत विचित्र अपघात हेलावून टाकणारा असल्याने नागरिकांतून हळहळ व्यक्त होत आहे. विशेष म्हणजे, अपघात झाला त्यावेळी वाहतूक शाखेचे कुणीही पोलीस तळेगाव चौकात घटनास्थळी नसल्याने बचावले.

दोन्ही चालकांवर गुन्हा दाखल
चाकण पोलिसांत याबाबत दोन्ही भरधाव वाहन चालकांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अजजुल हाके देवन निजामुद्दीन यांच्यासह फरारी झालेल्या अन्य एका कंटेनर चालकावर चाकण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल के केल्याची माहिती चाकण पोलीस ठाण्याचे सहाय्यक फौजदार एस. आर. वाघुले यांनी दिली.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.