Chakan : देवदर्शन करून परत येणाऱ्या कारचा अपघात; एकाचा मृत्यू

एमपीसी न्यूज – भोसरी येथील एक कुटुंब श्रावणी सोमवार निमित्त भीमाशंकर येथे देवदर्शन करण्यासाठी गेले. देवदर्शन करून परत येत असताना चालकाच्या निष्काळजीपणामुळे कार रस्त्याच्या कडेला धडकली. या अपघातात कारमधील एका प्रवाशाचा मृत्यू झाला. तर अन्य प्रवासी जखमी झाले. ही घटना सोमवारी (दि. 26) दुपारी चारच्या सुमारास खेड तालुक्यातील वाकी गावाजवळ घडली.

अनिल सुरेश शर्मा (वय 30) असे अपघातात मृत्यू झालेल्या प्रवाशाचे नाव आहे. याप्रकरणी शिवाजी रामदास शर्मा (वय 34, रा. भोसरी. मूळ रा. रमपुरा, गाव भातला, जि. ईराण, उत्तर प्रदेश) यांनी चाकण पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार रामचंद्र भिकाजी नाईकरे (रा. मोशी प्राधिकरण) याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी शिवाजी शर्मा त्यांच्या नातेवाईकांसोबत श्रावणी सोमवार निमित्त भीमाशंकर येथे देवदर्शनासाठी गेले. देवदर्शनाला जाण्यासाठी त्यांनी आरोपी रामचंद्र याची कार (एम एच 14 / ई एच 0399) भाड्याने घेतली. देवदर्शन करून परत येत असताना आरोपी रामचंद्र याने त्याची कार निष्काळजीपणे चालवली. यामुळे कार पुलाच्या कठड्याची धडकली. या अपघातात शिवाजी आणि त्यांचे नातेवाईक जखमी झाले. तसेच अनिल शर्मा हे गंभीर जखमी झाले. यातच अनिल यांचा मृत्यू झाला. याबाबत गुन्हा दाखल करण्यात आला असून चाकण पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.