Chakan : भांतू (कंजारभाट) समाज संघाच्या वतीने विमुक्त जाती मुक्ती दिवस साजरा

एमपीसी न्यूज – भांतू (कंजारभाट) समाज संघाच्या वतीने 68 वा विमुक्त जाती मुक्ती दिवस साजरा करण्यात आला. साहित्यरत्न लोकशाहीर अण्णा भाऊ साठे सांस्कृतिक कलारंग मंदिर येरवडा पुणे येथे अखिल भारतीय भांतू (कंजारभाट) समाज संघाच्या वतीने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

विमुक्त जातींना 31 ऑगस्ट 1952 रोजी स्वतंत्र दर्जा मिळाला त्यामुळे दरवर्षी 31 ऑगस्ट हा विमुक्त जाती मुक्ती दिवस म्हणून संपूर्ण भारतामध्ये साजरा केला जातो, असे भांतू (कंजारभाट) समाज संघाच्या वतीने सांगण्यात आले.

या कार्यक्रमात पुणे जिल्हा भांतू समाज संघाचे उपाध्यक्ष गोविंदा राठोड यांनी मार्गदर्शन करताना सांगितले की, विमुक्त भटक्यांची संपूर्ण भारतातील एकूण लोकसंख्या सुमारे १५ ते २० करोड असूनसुद्धा विमुक्त भटक्या जमातींकडे शासनाकडून जाणीव पूर्वक दुर्लक्ष केले जात आहे. या समाजातील पदवीधर झालेली मुले केवळ १९६१ च्या पुराव्याअभावी जातीचा दाखला किंव्हा जात वैधता प्रमाणपत्र नसल्यामुळे शासकीय नोकरीपासून वंचित आहेत.

पुढे ते म्हणाले की, स्थानिक स्वराज्य संस्थेत स्वतंत्र राजकीय आरक्षण नसल्यामुळे विमुक्त भटका समाज राजकीय विकासापासून दूर आहे. २०२१ साली विमुक्त भटक्यांची जातीनिहाय जनगणना ही झालीच पाहिजे, अशी मागणीही त्यांनी यावेळी केली.

या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी राष्ट्रीय भांतू समाज संघाचे अध्यक्ष सुनील मलके होते. या कार्यक्रमासाठी पिंपरी चिंचवडचे माजी महापौर कविचंद भाट, मा. सहायक आयुक्त सुभाष माछरे, दशरथ कचरावत, गोविंदा राठोड आदी उपस्थित होते.

या कार्यक्रमासाठी भांतू (कंजारभाट) समाजातील खेड तालुक्यातील सर्व समाज बांधव उपस्थित होते. या कार्यक्रमाची सांगता भांतू गीत व राष्ट्रगीताने करण्यात आली.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.