Chakan : किरकोळ कारणावरून तुंबळ हाणामारी; तेरा जणांवर गुन्हा दाखल

मोटार पेटवली; परस्परविरोधी तक्रारी

एमपीसी न्यूज- किरकोळ कारणावरून दोन गटात झालेल्या भांडणातून तुंबळ हाणामारी आणि एक मोटार पेटवून दिल्याची धक्कादायक घटना चाकण येथे बुधवारी (दि. ५) मध्यरात्री घडली. चाकण पोलिसांनी परस्पर विरोधी तक्रारीवरून तेरा जणांवर गुन्हे दाखल केले आहेत. गुन्हे दाखल करण्यात आलेल्यांमध्ये काही सराईत गुन्हेगारांचा समावेश आहे. संबंधित सराईत गुन्हेगारांवर कठोर कारवाई होत नसल्याने त्यांच्या कारवाया वाढत असून पोलिसांच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

राणी महेश जगनाडे ( वय 38 वर्षे, रा जुनी बाजारपेठ, चाकण, ता.खेड, जि. पुणे) यांच्या फिर्यादीवरून अमोल लाटूकर, टिल्या घोडके, मोनेश घोगरे, विवेक कुऱ्हाडे, अभिषेक घोडके, राहुल गोरे, अमोल तनपुरे, पन्या शिंदे ( सर्व रा चाकण, ता. खेड जि.पुणे) या आठ जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

राणी जगनाडे यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार वरील सर्वांनी बेकायदा विनापरवाना जमाव जमवून हातात काठ्या व दगड आणून टिल्या घोडके याने फिर्यादी जगनाडे यांस व फिर्यादीचे पुतणे दत्तात्रय मधुकर जगनाडे यांना शिवीगाळ दमदाटी करून फिर्यादीचे इमारतीसमोर मोकळे जागेत लावलेली फिर्यादीची इको कार (एम एच 14 जी एच7654 ) काठ्या व दगड मारून फोडली असल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे. दरम्यान नंतर पेटवून देण्यात आली असल्याचे स्थानिकांनी सांगितले.

रामनाथ सुखदेव घोडके ( वय 17 , रा. खंडोबाचा माळ , चाकण, ता. खेड, जि.पुणे) यांनी याबाबत चाकण पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून राणी महेश जगनाडे , दत्ता जगनाडे, सतपाल, शेखर बनसोडे , विशाल मुंगळे (सर्व रा. चाकण , ता. खेड, जि पुणे) यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे.

घोडके यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार राणी जगनाडे यांनी ‘मुलीला फोन का करतो?’असे म्हणून फिर्यादीस घरात डांबून ठेवून बेकायदा विनापरवाना जमाव जमवून फिर्यादीस हाताने व लाकडी दांडक्याने मारहाण करून शिवीगाळ करून जीवे ठार मारण्याची धमकी दिली. या मारहाणीत फिर्यादी घोडके यांच्या तोंडाला दुखापत होऊन हाताला व डोक्याला मुका मार लागला असल्याचेही त्यांनी आपल्या फिर्यादीत नमूद केले आहे. चाकण पोलीस अधिक तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.