HB_TOPHP_A_

Chakan : जेल तोडून पळालेल्या आणि 33 गुन्हे दाखल असलेल्या सराईत आरोपीला अटक

चाकण पोलिसांची कामगिरी

824

एमपीसी न्यूज – खेड पोलीस ठाण्याची जेल तोडून पळून गेलेल्या आणि 33 गुन्हे दाखल असलेल्या आरोपीसह अन्य दोघांना अटक केली. आरोपींकडून आठ लाख रुपयांचा ऐवज जप्त करण्यात आला आहे. ही कारवाई चाकण पोलिसांनी केली.

HB_POST_INPOST_R_A

विशाल दत्तात्रय तांदळे (वय 22, रा. बैलबाजार रोड, मंचर), गणेश भास्कर वाबळे (वय 18, रा. भेंडमळा, मंचर), आरिफ अस्लम नाईकवाडे (वय 21, रा. संभाजी नगर, मंचर) अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शनिवारी (दि. 12) रात्री साडेदहाच्या सुमारास खराबवाडी येथील वाघजाई नगर पाण्याच्या टाकीजवळ एका बोलेरो कारला (एम एच 14 / ए सी 6923) स्विफ्ट डिझायर कार (एम एच 14 / डी एक्स 8785) आडवी लावून पाच जणांनी मिळून बोलेरो मधील व्यक्तीला चाकूचा व लोखंडी कोयत्याचा धाक दाखवून लुटले. तसेच बोलेरो घेऊन पसार झाले. याबाबत चाकण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.

गुन्हा घडल्यानंतर बोलेरो कारचा शोध घेत असताना, कार आंबेठाण बाजूकडे गेल्याचे पोलिसांना समजले. पोलिसांनी सावरदरी येथील एअर लिक्विड चौकात सापळा रचला. पोलिसांना पाहून आरोपी वाहने सोडून पळू लागले. पोलिसांनी शिताफीने तिघांना पकडले. तर आरोपींचे अन्य दोन साथीदार अंधाराचा फायदा घेऊन पळून गेले. आरोपींकडून बोलेरो कार, गुन्ह्यासाठी वापरलेली स्विफ्ट कार आणि रोख रक्कम असा एकूण आठ लाख रुपयांचा ऐवज पोलिसांनी जप्त केला.

अटक केलेल्या आरोपींमध्ये विशाल तांदळे हा 20 ऑक्टोबर 2018 रोजी खेड पोलीस ठाण्याची जेल तोडून पळून गेला होता. त्याच्याविरोधात पुणे ग्रामीण, नाशिक ग्रामीण, अमरावती शहर, अहमदनगर, बीड, पुणे रेल्वे, पिंपरी-चिंचवड आयुक्तालय अशा वेगवेगळ्या ठिकाणी जबरी चोरी, घरफोडी, मोटारसायकल चोरीचे तब्बल 33 गुन्हे दाखल आहेत. खेड पोलीस ठाण्यातील जेल तोडून पळून गेल्यानंतर तांदळे याने नाशिक मधील वावी पोलीस स्टेशन, ओझर पोलीस स्टेशन, अमरावती शहरात राजापेठ पोलीस स्टेशन, बीड जिल्ह्यात गेवराई पोलीस स्टेशनच्या हद्दीत जबरी चोरीचे गुन्हे केले आहेत.

आरोपी तांदळे त्याच्या साथीदारांना सोबत घेऊन मोबाईल वरून कार बुक करत असे. कारमध्ये बसल्यानंतर ठराविक ठिकाणी कार आली कि कार चालकाला मारहाण करून त्याला खाली उतरवून कार घेऊन पसार होत असे. त्याने महमदनगर जिल्ह्यात कर्जत पोलीस ठाण्याच्या हद्दीत खुनाचा प्रयत्न केला आहे. त्याच्याकडे सापडलेल्या स्विफ्ट कारला बनावट नंबर प्लेट लावलेली होती. या कार बाबत नाशिक ग्रामीण मधील वावी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल आहे.

ही कामगिरी पोलीस आयुक्त आर के पद्मनाभन, अप्पर पोलीस आयुक्त मकरंद रानडे, पोलीस उपायुक्त स्मार्तना पाटील, सहाय्यक पोलीस आयुक्त चंद्रकांत अलसटवार यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुनील पवार, पोलीस उपनिरीक्षक संजय निलपत्रेवार, विजय जगदाळे, पोलीस कर्मचारी शिवानंद स्वामी, संदीप सोनवणे, संजय जरे, हनुमंत कांबळे, अनिल गोरड, सातकर, गायकवाड, राळे, निखिल वर्पे यांच्या पथकाने केली.

HB_POST_END_FTR-A4
HB_POST_END_FTR-A1

%d bloggers like this: