Chakan : पुणे-नाशिक राष्ट्रीय महामार्गावर वाहतूककोंडीच्या विरोधात नागरिकांचं आंदोलन

एमपीसी न्यूज – पुणे-नाशिक राष्ट्रीय महामार्गावर होणारी वाहतूक कोंडी ही आता नित्याचीच बाब झाली आहे. या वाहतूक कोंडीमुळं त्रस्त झालेल्या नागरिकांची यातून सुटका व्हावी, यासाठी माजी आमदार विलास लांडे यांच्या नेतृत्वाखाली चाकण तळेगाव चौकात आंदोलन करण्यात आले.

जिजाऊ प्रतिष्ठानच्या कार्यकर्त्यांसह चाकण आणि पिंपरी-चिंचवड शहरातील नागरिक या आंदोलनात सहभागी झाले होते. यावेळी रस्त्याने जाणाऱ्या प्रवाशांनी देखील रोजच्या होणाऱ्या वाहतूककोंडीबद्दल संताप व्यक्त केला.

  • रोज रोज ट्राफिकमध्येच मरायचं का……?, क्लच दाबून दुखतोय ना पाय…..,काय दादा, पेट्रोलमध्ये जातोय ना पैसा……यासारखे फ्लेक्स हातात घेऊन नागरिक आपला रोष व्यक्त करत होते. गेल्या पंधरा वर्षात खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांनी केवळ महामार्गाचं काम सुरू होईल, हे गाजर लोकांना दाखवलं, पण प्रत्यक्षात कामाची परिस्थिती ‘जैसे थे’च आहे. वाहतूककोंडीमुळे होणाऱ्या अपघातात अनेकांना आपले जीव गमवावे लागलेत, तर अनेकजण जखमी झालेत. तरी विद्यमान खासदार फक्त आश्वासनाच गाजर दाखवतात, त्याविरोधात नागरिकांनी प्रचंड रोष व्यक्त केला.

वेळेवर आपल्या इच्छितस्थळी पोहोचण्याचा प्रयत्न करणारे वाहनचालक अनेकदा तीन-चार तास या वाहतूककोंडीत अडकून पडतात. त्यामुळे या मार्गावर प्रवास करणाऱ्या प्रवाशांची अवस्था ‘रोजचं मढ, त्याला कोण रड’ अशी झाली आहे. जिथं केवळ 10 मिनिटांच अंतर आहे तिथं पोहोचायला एक ते दीड तास लागतो.

  • लोकप्रतिनिधी आणि प्रशासन कोणीही या प्रश्नाकडे गांभीर्याने बघत नाही, जीव जातो तो आमचाच, अशा शब्दात नागरिकांनी आल्या संतप्त प्रतिक्रिया व्यक्त केल्या.

    

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.