Chakan : सदनिका धारकांना सुविधा न दिल्या प्रकरणी बारा जणांवर गुन्हा दाखल

मेदनकरवाडीतील टूलीप होम्स मधील प्रकार

एमपीसी न्यूज- चाकण परिसरात सामान्य ग्राहकांना वर्षानुवर्षे सदनिकेचा ताबा न देण्याचे प्रकार समोर येत असतानाच उभ्या करण्यात आलेल्या इमारतीत सोयीसुविधा दिल्या जात नसल्याचे उघडकीस आले आहे. चाकण जवळील मेदनकरवाडी ( ता. खेड) मध्ये अशाच एका गृहप्रकल्पात बिल्डरकडून रहिवाशांना कसल्याही सुविधा न देता वाऱ्यावर सोडल्याचा प्रकार घडला असून सदनिकाधारकांनी थेट पोलिसांत गुन्हा दाखल केला आहे. सदनिका धारकांच्या तक्रारीवरून चाकण पोलिसांनी टूलीप होम्स या गृहप्रकल्पाचे बिल्डर असलेल्या बारा जणांच्या विरुद्ध नुकताच फसवणुकीचा गुन्हा नोंदवला आहे .

मेदनकरवाडी (ता. खेड) येथे टूलीप होम्स हा सुमारे 278 सदनिका असलेला गृहप्रकल्प पाच वर्षांपूर्वी उभा करण्यात आला आहे. मात्र येथील अनेक सदनिका धारकांना पूर्णत्वाचा दाखला, सांडपाणी व्यवस्था, पिण्याच्या पाण्याची व्यवस्था, स्थानिक ग्रामपंचायतीमध्ये नोंदी, गृहप्रकल्पाची सोसायटी स्थानिक सदनिका धारकांकडे हस्तांतरण करण्यात आले नाही. तसेच सदनिका धारकांना लेखी दिल्याप्रमाणे उद्यान, फायर फायटिंग यंत्रणा, लिफ्ट व इतर सुविधा दिल्या नसल्याचे सदनिका धारकांचे म्हणणे आहे.

यामुळे सोसायटीमधील नागरिकांनी अनेकदा बिल्डर मंडळींशी संपर्क करून काहीही उपयोग न झाल्याने नागरिकांनी थेट पोलीस ठाण्यात धाव घेतली. या बाबत सदनिका धारक सदाशिव शशिकांत गोखले ( वय 42) यांनी चाकण पोलिसांत दिलेल्या तक्रारीवरून जीकुरवाह अब्बासअली चौधरी, पुरुषोत्तमदास अर्जनभाई पटेल, सतीश मणिलाल पटेल, विनोद नारणभाई पटेल, दिलीपकुमार रतीभाई पटेल, नरेंद्रभाई नारणभाई पटेल, रमेशभाई करसनभाई पटेल, निकुंजकुमार पुरुषोत्तमदास पटेल, सुरेश भावजीभाई पटेल, सतीश ज्ञानेश्वर रिंधे, राकेश दिलीप गायकवाड, तन्वीर उस्मान शेख आदींच्या विरुद्ध भा.दं. वि कलम 420, 406 महाराष्ट्र मालकी हक्काच्या सदनिका अधिनियम 1963 अन्वये गुन्हा दाखल केला आहे. या बाबत अधिक तपास चाकण पोलीस करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.