Chakan : महसुलातील साट्यालोट्यांचा भ्रष्टाचार चव्हाट्यावर !

मंडलाधिकारी, तलाठी व लिपिकाचे निलंबन

एमपीसी न्यूज- पुनर्वसन जमीन वाटपाच्या संदर्भात पदाचा दुरुपयोग करून खोट्या दस्तऐवजाच्या माध्यमातून भोगवटा वर्ग दोनची जमीन भोगवटा वर्ग एक तयार करून शासनाची फसवणूक केल्याप्रकरणी खेडचे तत्कालीन नायब तहसीलदार बी.बी. बोडके यांचे निलंबन होऊन त्यांच्यावर पोलिसांत गुन्हाही दाखल झाला. त्यानंतर आता याच प्रकरणात चाकणचे मंडलाधिकारी बाळकृष्ण उर्फ बाबा साळुंके, तलाठी दीपिका बच्छाव आणि लिपिक सुनील रोकडे यांचेही निलंबन झाल्याने महसुलातील साट्यालोट्यांचा भ्रष्टाचार चव्हाट्यावर आल्याची चर्चा होत आहे.

खेड तालुक्यात पुनर्वसनासाठी जमीन दिल्याचे बनावट आदेश तयार करण्यात झारीतील शुक्राचार्य नेमेक कोण -कोण आहेत असा प्रश्न निर्माण झाला आहे. पुनर्वसन विभागाच्या अशा बनावट आदेशाद्वारे त्याची सात बारावर नोंदणी करुन ती जमीन तातडीने दुसऱ्याला विकण्याचे गुन्हे खेड तालुकाच नव्हे तर जिल्ह्याच्या अनेक तालुक्यांमध्ये घडत असल्याचे आढळून येत असून जमीन पुनर्वसनासाठी दिल्याचे बनावट आदेश तयार करुन त्या जमिनी विकल्याचे प्रकार यापूर्वी समोर आले आहेत.

धरण, कालवे व अन्य विविध विकास कामांसाठी शासन शेतकऱ्यांकडून गरजेनुसार जमीन अधिग्रहित करते. यामध्ये विस्थापित झालेल्यांचे पुनर्वसन इतर ठिकाणी केले जाते. त्यासाठी शासन जमीन अधिग्रहित करुन ठेवते व बाधित झालेल्यांना त्याचे वाटप करते. हे काम पूनर्वसन विभागाकडून होत असते. परंतु, गेल्या काही वर्षांमध्ये जिल्ह्यामध्ये पुनर्वसनात जमीन मिळाली असल्याचे बनावट आदेश तयार करुन त्यावर खोट्या सह्या व बनावट चलन तयार करुन देणारी टोळी खुद्द प्रशासनातील काही मंडळीना हाताशी धरून कार्यरत असल्याचा संशय आहे. अनेक तालुक्यांमध्ये अशा बनावट कागदपत्राद्वारे शासनाच्या जमिनीचा आदेश तयार करुन त्याची सातबारा वर नोंद करुन घेतली जात आहे. अशी नोंद सातबारा वर झाली की त्या जमिनी तातडीने दुसऱ्यांना विकल्या जात आहेत.

ताळमेळ नसल्याने फावले

पुनर्वसन आणि सात बारा नोंदणी करणारे तहसील कार्यालये हे दोन्ही विभाग महसूल विभागात येत असताना त्यांच्यात परस्परात वर्षानुवर्षे ताळमेळ नसल्याने जिल्ह्यात करोडो रुपयांचे व्यवहार होऊन फसवणुकीच्या घटना घडत आहे. खेड तालुक्यात शासनाने पुनर्वसनासाठी जमीन दिल्याचे बनावट आदेश तयार करुन बोगस कागदपत्रांच्या आधारे पुनर्वसन जमीन वाटपाबाबत संबंधित पुनर्वसन विभागातील लिपीक, तलाठी आणि मंडलाधिकारी यांनी नोंदी घेतल्याचे स्पष्ट झाल्याने कारवाई करण्यात आली आहे. याच प्रकरणात शासनाची फसवणूक केल्याप्रकरणी खेडचे तत्कालीन नायब तहसीलदार बी.बी. बोडके यांच्यावर गुन्हा दाखल करून निलंबित करण्यात आले होते.

कारवाईच्या कात्रीत कोण-कोण ?

पुनर्वसनात आदेश झालेली काळूस, पिंपळगाव, साबळेवाडी, शिरोली, आदी गावे आहेत. याच कार्यपद्धतीचा अवलंब करून अशा एकूण २१ नोंदी याच कालावधीत वेगवेगळ्या मंडलाधिकारी मंडळींनी घातल्या आहेत. पिंपळगाव तर्फे खेड, कडूस आणि पाईट येथील तत्कालीन मंडलाधिकारी यांनी देखील पुनर्वसनात प्राप्त झालेल्या आदेशाच्या नोंदी ह्या एकाच दिवसात मंजूर केल्या आहेत. स्थानिक मंडलाधिकारी यांच्या मार्फत त्या तीन मंडळाधिकाऱ्यांची चौकशी समिती नेमून चौकशी करण्यात आली होती. त्याबाबतचा अहवाल जिल्हाधिकारी कार्यालयास लवकरच सादर होणार आहे. खरपुडी बुद्रुक येथील पुनर्वसनाच्या आदेशात तत्कालीन मंडलाधिकारी बाळकृष्ण उर्फ बाबा साळुंके यांच्यावर अप्पर जिल्हाधिकारी पुणे यांच्या अध्यक्षतेखाली समितीच्या माध्यामातून चौकशी करून मंडल अधिकारी, तलाठी व पुनर्वसन लिपिक यांनी पुराव्याची कागदपत्रे केल्यानंतर 1998 च्या त्या आदेशावरून नोंद प्रमाणित केल्याचा ठपका ठेवून निलंबन केले आहे. याच कार्यपद्धतीचा अवलंब करून इतर मंडल अधिकारी यांनी नोंदी प्रमाणित केल्या असल्याने त्यांच्यावर टांगती तलवार असल्याची चर्चा महसूल विभागात आहे.

धरणग्रस्तांच्या बाबत बेबनाव नको

महसूल विभागात विविध कार्यालयांमध्ये भ्रष्टाचार होतोच होतो असा उघड आरोप सामान्य नागरिक करू लागले आहेत. भ्रष्टाचारी नसलेले हाताच्या बोटावर मोजण्या इतपत देखील सापडत नाहीत ही वस्तुस्थिती आहे . महसूल विभागातील कागदपत्रांचे सोपस्कार पुरे करताना काय करावे लागते, हे सर्वश्रुत आहे. हा सगळा साट्यालोट्यांचा भ्रष्टाचार असल्याचा सामन्यांचा आरोप आहे. नाडलेल्या गोरगरिबांचे आणि केवळ कागदोपत्री अडून असलेले काम पैसा घेतल्यावर बोगसगिरी करून मार्गी लावण्याची किमया या लाचेत आहे. त्यामुळे लाच देणाऱ्याचाही फायदा असल्याने ते तक्रार करीत नाहीत. लाच देण्याची ऐपत असलेल्यांची गोष्ट वेगळी, मात्र, पुनर्वसनाअभावी धरणग्रस्त अक्षरशः उद्ध्वस्त होण्याच्या मार्गावर असताना होणारा हा बेबनाव निषेधार्ह असल्याची धरणग्रस्त नागरिकांची भूमिका आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.