Chakan : लिफ्ट देण्याच्या बहाण्याने दाम्पत्याला लुटले
एमपीसी न्यूज – लिफ्ट देण्याच्या बहाण्याने पती-पत्नीला कारमध्ये बसवून त्यांना लुटले. ही घटना बुधवारी (दि. 31) महाळुंगे ते नाणेकरवाडी दरम्यानच्या रस्त्यावर सकाळी दहाच्या सुमारास घडली.
मुकेश गोविंद राठोड (वय 24, रा. खालूंब्रे, ता. खेड. मूळ रा. पारखेड, ता. मेहकर, जि. बुलढाणा) यांनी याप्रकरणी चाकण पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार अज्ञातांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मुकेश आणि त्यांची पत्नी महाळुंगेकडून चाकणकडे जाण्यासाठी गाडीची वाट पाहत होते. त्यावेळी तळेगाव रस्त्याने एक पांढऱ्या रंगाची इंडिका कार आली. त्यातील तिघांनी मुकेश आणि त्यांच्या पत्नीला लिफ्ट देण्याचा बहाणा करून कारमध्ये बसवले.
दोघे पती पत्नी कारमधून जात असताना नाणेकरवाडी शिवारात कार आली असता एकाने मुकेश यांच्या डोळ्यावर काळी पट्टी बांधली. त्यांना सीटमध्ये सीटखाली दाबले आणि त्यांच्या पत्नीजवळ असलेले पाच ग्रॅम वजनाची सोन्याची पोत, अर्धा तोळा वजनाचे सोन्याचे गंठण, एक तोळा वजनाची सोन्याची बोरमाळ, एक तोळा वजनाचे सोन्याचे झुंबर जोड वेल, एक मोबाईल फोन, 100 रुपये रोख असा एकूण 98 हजार 100 रुपयांचा ऐवज चोरून नेला.
यावरून गुन्हा दाखल करण्यात आला असून चाकण पोलीस तपास करीत आहेत.