Chakan: विवाह सोहळ्यासाठी गर्दी केल्याप्रकरणी वधू-वराच्या पित्यांसह जागा मालकावर गुन्हा

Chakan: Crime against landlord, father of bride and groom for crowding for wedding ceremony आयोजकांकडे विवाह सोहळ्यासाठी पोलिसांकडून अथवा अन्य शासकीय विभागाकडून परवानगी घेतली आहे का, याबाबत विचारणा केली.

एमपीसी न्यूज- विवाह सोहळ्यासाठी शासनाने 50 लोकांना एकत्र येण्यासाठी परवानगी दिली आहे. मात्र त्यातही कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव होऊ नये, याची काटेकोर काळजी घेण्याच्या देखील सूचना देण्यात आल्या आहेत. विवाह सोहळ्यासाठी पोलीस परवानगी घेणे आवश्यक आहे. चाकण येथे सोमवारी सायंकाळी झालेल्या एका विवाह सोहळ्यासाठी सुमारे 70 ते 80 लोक एकत्र आले. तसेच आयोजकांनी पोलिसांची परवानगी देखील घेतली नाही. याबाबत पोलिसांनी वधू आणि वराच्या पित्यावर तसेच ज्या जागेत विवाह सोहळा सुरु होता, त्या जागा मालकावर देखील गुन्हा दाखल केला आहे.

वधू पिता राजेन्द्र मधुकर येळवंडे तर वर पिता सुरेश मारुती बेंडाले आणि जागा मालक चद्रकांत बेंडाले अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत. याप्रकरणी पोलीस शिपाई दत्तात्रय शेळके यांनी चाकण पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, राजेंद्र येळवंडे यांचा मुलगा आणि सुरेश बेंडाले यांची मुलगी यांचा विवाह सोहळा 29 जून रोजी सायंकाळी सव्वा पाच वाजता पार पडला.

खेड तालुक्यातील निघोजे येथे शिवपार्वती नगर बेंडाले वस्ती येथे चंद्रकांत बेंडाले यांच्या कंपनीच्या मोकळ्या जागेत हा विवाह सोहळा आयोजित करण्यात आला होता.

सोमवारी सायंकाळी पोलीस शिपाई दत्तात्रय शेळके, कामले, किरण सांगळे, शिकारे यांचे पथक निघोजे गावात पेट्रोलिंग करीत होते. त्यावेळी त्यांना शिवपार्वती नगर बेंडले वस्ती येथे लोकांची गर्दी दिसली.

पोलिसांनी पुढे जाऊन पाहणी केली असता विवाह सोहळ्याचा कार्यक्रम सुरु असल्याचे दिसले. पोलिसांनी निघोजे गावचे पोलीस पाटील राहुल फडके यांना तात्काळ बोलावून घेतले.

आयोजकांकडे विवाह सोहळ्यासाठी पोलिसांकडून अथवा अन्य शासकीय विभागाकडून परवानगी घेतली आहे का, याबाबत विचारणा केली. त्यावेळी आयोजकांनी कोणतीही परवानगी घेतली नसल्याचे निदर्शनास आले.

त्यातच शासनाने घालून दिलेल्या लोकांच्या एकत्र जमण्याच्या अटीचे देखील उल्लंघन झाले होते. यामुळे वर पिता, वधू पिता आणि जागा मालक यांच्या विरोधात भारतीय दंड विधान कलम 188, 269, 34 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. चाकण पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.