Chakan Crime : कंपनीतून सव्वादोन लाखांच्या केबल चोरीला

एमपीसी न्यूज – अज्ञात चोरट्यांनी कंपनीत चोरी करून दोन लाख 30 हजार रुपये किमतीच्या केबल वायर चोरून नेल्या. ही घटना 11 ऑक्टोबर रोजी सकाळी वाघजाई नगर, खराबवाडी येथे उघडकीस आली.

कल्पेश गुलाब बारणे (वय 32, रा. दोंदे बारणेवस्ती, ता. खेड) यांनी याबाबत मंगळवारी (दि. 13) चाकण पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी अज्ञात चोरट्यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी बारणे काम करत असलेल्या कंपनीच्या पाठीमागील खिडकी व ऑफिसच्या बाजूचे गज कापून अज्ञात चोरट्यांनी कंपनीत प्रवेश केला. कंपनीतून दोन लाख 30 हजार 552 रुपये किमतीच्या 15 प्रकारच्या केबल वायर चोरट्यांनी चोरून नेल्या. हा प्रकार 10 ऑक्टोबर रोजी सायंकाळी सहा ते 11 ऑक्टोबर रोजी सकाळी साडेनऊ या कालावधीत घडला आहे. चाकण पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.