Chakan Crime : अधिवेशनासाठी निघालेल्या आमदार दिलीप मोहिते यांच्या कारला अपघात; 22 दिवसानंतर गुन्ह्याची नोंद

एमपीसी न्यूज – विधानसभेच्या अधिवेशनासाठी निघालेले राष्ट्रवादी काँग्रेसचे खेड आळंदी विधानसभेचे आमदार दिलीप मोहिते यांच्या कारला स्पायसर चौक कुरुळी येथे अपघात झाला. सिग्नल तोडून निघालेली कार आमदारांच्या कारसमोर येऊन थांबली.

त्या थांबलेल्या कारला एका टेम्पोने जोरदार धडक दिल्याने सिग्नल तोडून निघालेली कार आमदारांच्या कारवर जोरात आदळली. ही घटना 6 सप्टेंबर रोजी घडली असून याबाबत रविवारी (दि. 27) गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

आमदार दिलीप मोहिते यांच्या कारचे चालक तुषार सुरेश तनपुरे (वय 29, रा. राजगुरूनगर, खेड) यांनी चाकण पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार स्विफ्ट कारचालक नवनाथ सुदाम नरे (वय 39, रा. पाबळ, ता. शिरूर), टेम्पोचालक भूषण शिवाजी निकम (वय 27, रा. औरंगाबाद) यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

महाराष्ट्र विधानसभेचे अधिवेशन 7 आणि 8 सप्टेंबर रोजी पार पडले. त्या अधिवेशनासाठी खेड-आळंदी विधानसभा मतदारसंघाचे राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार दिलीप मोहिते 6 सप्टेंबर रोजी रात्री दहा वाजता त्यांच्या खेड तालुक्यातील घरून कारने (एम एच 14 / एफ क्यू 7557) निघाले होते. त्यावेळी त्यांच्यासोबत सुरक्षारक्षक प्रफुल गायकवाड आणि फिर्यादी कारचालक तुषार तनपुरे हे होते.

फिर्यादी तनपुरे कार चालवत होते. आमदारांची कार कुरुळी येथील स्पायसर चौकात आली आणि सिग्नलवर थांबली. सिग्नल सुटल्यानंतर निघोजे गावाकडे जात असताना समोरून आरोपी नवनाथ नरे याची कार सिग्नल तोडून भरधाव वेगात आली. नवनाथ आणि फिर्यादी यांच्या कारची धडक होणारच एवढ्यात दोन्ही कार चालकांनी ब्रेक लाऊन कार थांबवली.

मात्र, नवनाथच्या कारच्या मागून एक आयशर टेम्पो देखील सिग्नल तोडून आला. टेम्पोने नवनाथच्या स्विफ्ट कारला मागून जोरात धडक दिली. त्यामुळे नवनाथची स्विफ्ट कार आमदार मोहिते यांच्या ऑडी कारवर आदळली. यामध्ये आमदारांच्या ऑडी कारचा बंपर, बंपरची जाळी, गाडीचा लोगो, फोकलॅंप, नंबर प्लेट तुटून 60 हजारांचे नुकसान झाले.

या अपघातात कोणीही जखमी झाले नाही. विधानसभेचे अधिवेशन संपल्यानंतर याबाबत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.