Chakan Crime : राजकीय वादातून दोघांवर खुनी हल्ला

एमपीसी न्यूज – मागील निवडणुकीच्या कारणांवरून दोन गटात सुरु असलेला वाद विकोपाला जाऊन सहा जणांनी मिळून दोघांवर कोयत्याने वार करत खुनी हल्ला केला. ही घटना बुधवारी (दि. 16) रात्री साडेनऊ वाजताच्या सुमारास खालुम्ब्रे येथे घडली.

अशोक उर्फ पिंट्या सुरेश तुळवे (वय 36, रा. तुळवेवस्ती, खालुम्ब्रे, ता. खेड), विशाल तुळवे अशी जखमी व्यक्तींची नावे आहेत. अशोक यांनी याप्रकरणी चाकण पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी गणेश अनिल तुळवे, किशोर तुळवे, आकाश तुळवे आणि अन्य तीन जणांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी अशोक आणि आरोपी यांच्यामध्ये राजकीय कारणांवरून वाद सुरु होते. मागील निवडणुकीच्या वेळी त्यांच्यात आणखी वाद झाले होते. त्याचा राग आरोपींच्या मनात होता. बुधवारी रात्री साडेनऊ वाजताच्या सुमारास फिर्यादी आकाश आणि त्यांचा भाऊ विशाल हे तहान लागली म्हणून खालुम्ब्रे येथील हुंदाई चौकात असलेल्या चायनीजच्या गाडीसमोर पाणी पिण्यासाठी थांबले.

पाणी पित असताना अचानक आरोपी गणेश याने मागून अशोक यांच्यावर कोयत्याने डोक्यात वार केले. अशोक यांनी मागे वळून पाहिले असता आरोपींनी ‘तुम्हाला आता जिवंतच ठेवत नाही’ असे म्हणत आणखी वार करून गंभीर जखमी केले.

त्यानंतर आरोपी गणेश याने फिर्यादी यांचा भाऊ विशाल याच्याही डोक्यात कोयत्याने वार केले. त्यानंतर ‘यांना आता जिवंत ठेऊ नका, मारून टाका’ असे आरोपी गणेश याने अन्य आरोपींना सांगितले. अन्य आरोपींनी फिर्यादी अशोक आणि विशाल यांना रॉड आणि लाथाबुक्क्यांनी मारून आणखी जखमी केले. चाकण पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.