Chakan crime News : बाजार समितीतील गाळ्यामधून 41 कांद्याच्या गोण्या चोरीला

एमपीसी न्यूज – सध्या कांद्याचे भाव चांगलेच वाढले आहेत. त्यामुळे कांद्याची चोरी देखील होत आहे. शेल पिंपळगाव येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमधील एका गाळ्यातून चोरट्यांनी 41 कांद्याच्या गोण्या चोरून नेल्या आहेत. हा प्रकार शनिवारी (दि. 26) सकाळी उघडकीस आला आहे.

अभिजित बबन मासाळकर (वय 36, रा. जातेगाव खुर्द, ता. शिरूर) यांनी याप्रकरणी चाकण पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी अज्ञात चोरट्यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांचा शेल पिंपळगाव येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये गाळा आहे. ते कांद्याचे व्यापारी आहेत. त्यांच्या गाळ्यात तयार केलेल्या कांदा चाळीतून अज्ञात चोरट्यांनी 65 हजार 600 रुपयांच्या 41 कांद्याच्या गोण्या चोरून नेल्या आहेत. हा प्रकार शुक्रवारी (दि. 25) रात्री नऊ ते शनिवारी (दि. 26) सकाळी सात या कालावधीत घडला आहे.

कांद्याला सध्या मोठी मागणी असून अद्याप नवीन कांदा मार्केटमध्ये आलेला नाही. त्यामुळे जुन्या कांद्याला सोन्याचा भाव आला आहे.

किरकोळ बाजारात कांदा 50 रुपये किलोने विकला जात आहे. तर ठोक बाजारात कांद्याचे भाव 30 ते 40 रुपये किलो आहेत. कांदा महाग झाल्याने चोरट्यांकडून आता कांदा चोरीचे प्रकार केले जात आहेत.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.