Chakan : विनापरवाना दारूविक्री करणा-या चौघांना अटक; 12 लाखांचा ऐवज जप्त

एमपीसी न्यूज – विनापरवाना दारूविक्री करणा-या टोळीला अटक करून त्यांच्याकडून तब्बल 12 लाख 20 हजार 195 रुपयांचा ऐवज जप्त करण्यात आला आहे. ही कारवाई मंगळवारी (दि. 13) दुपारी साडेचारच्या सुमारास वाघजाईनगर येथे चाकण पोलिसांनी केली.

सिद्धांत प्रभाकर सानप (वय 26), गजानन रामराव बांगर (वय 32, दोघे रा. रा. खराबवाडी, वाघजाईनगर, चाकण), स्वप्नील विलास काकडे (वय 26, रा. पालघरे वस्ती, चिखली), संदीप भानुदास जांभूळकर (वय 28, रा. माणिक चौक, चाकण) अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. संतोष राजाराम सुरवसे (रा. काळेवाडी) हा आरोपी अद्याप फरार आहे. याप्रकरणी पोलीस शिपाई आशिष बनकर यांनी फिर्याद दिली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, वाघजाईनगर चाकण येथील पाण्याच्या टाकीजवळ बेकायदेशीरपणे दारू विक्री होत असल्याची माहिती चाकण पोलिसांना मिळाली. त्यानुसार पोलिसांनी सापळा रचून दारू विक्री होणा-या ठिकाणी छापा मारला. त्यावेळी पाच जण घटनास्थळी आढळून आले. त्यांच्याकडून 10 लाख 50 हजार रुपये किमतीचा महिंद्रा इको टेम्पो (एम एच 14 / जी डी 0462) आणि मारुती सुझुकी कार (एम एच 12 / जी के 9536) आणि 1 लाख 70 हजार 195 रुपये किमतीचे देशी, विदेशी दारू, बियरचे बॉक्स असा एकूण 12 लाख 20 हजार 195 रुपयांचा ऐवज जप्त केला. यामध्ये चार जणांना अटक करण्यात आली असून एक आरोपी अदयाप फरार आहे. चाकण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून खंडणी दरोडा विरोधी पथकाचे पोलीस उपनिरीक्षक पी टी चाटे तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.