Chakan crime News : व्यावसायिकाकडे खंडणी मागणाऱ्या सराईत गुन्हेगाराला बेड्या

पोलिसात तक्रार केल्यास गोळ्या घालून मारण्याची दिली होती धमकी

एमपीसी न्यूज – ‘कंपनीत सुरु असलेले डेव्हलपिंगचे काम मला दे, नाहीतर मला महिन्याला 50 हजारांची खंडणी दे’ अशी धमकी देत सहा जणांनी मिळून एका व्यावसायिकाला मारहाण केली. तसेच ‘पोलिसात तक्रार दिल्यास तुला गोळ्या घालून मारून टाकीन’ अशी धमकी दिल्याचा प्रकार खेड तालुक्यातील भांबोली येथे बुधवारी घडला होता. त्यातील सराईत गुन्हेगाराला पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत.

संतोष मधुकर मांजरे (वय 29, रा. कोरेगाव खुर्द, ता. खेड) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. त्याच्यासह नारायण घावटे (रा. शेलू, ता. खेड), सोन्या (पूर्ण नाव पत्ता माहिती नाही) आणि अन्य तीन अनोळखी व्यक्ती यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत विजय शिवाजी राऊत (वय 31, रा. भांबोली, ता. खेड) यांनी चाकण पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश यांनी दिलेल्या माहितीनुसार, सदानंद मोल्ड अँड टूल्स प्रा. ली. या कंपनीच्या डेव्हलपिंगचे काम फिर्यादी राऊत यांच्याकडे आहे.

आरोपी संतोष याने बेकायदेशीर गर्दी जमवून राऊत यांना ‘कंपनीतील डेव्हलपिंगचे काम मला पाहिजे. तुझे कंपनीमध्ये चालू असलेले डेव्हलपिंगचे काम बंद कर. तुला जर डेव्हलपिंगचे काम चालू ठेवायचे असेल तर तुला महिन्याला 50 हजार रुपये खंडणी म्हणून द्यावे लागतील. मला तू महिन्याला 50 हजार रुपये खंडणी दिली नाहीस, तर मी तुला डेव्हलपिंगचे काम करून देणार नाही. तुला जिवंत सोडणार नाही’ अशी धमकी दिली.

फिर्यादी राऊत यांनी खंडणी देण्यास नकार दिला. तसेच काम बंद करणार नसल्याचेही आरोपींना सांगितले. त्यावरून आरोपींनी राऊत यांना लाथाबुक्क्यांनी मारहाण करून खुर्ची फेकून मारली. त्यात राऊत जखमी झाले. ‘तू जर पोलीस स्टेशनला तक्रार दिली तर तुला गोळ्या घालून मारून टाकीन’, अशी धमकी आरोपींनी राऊत यांना दिली.

दरम्यन, या गुन्ह्याचा तपास करत असताना आरोपी मांजरे हा कुरकुंडी गावाकडून कोरेगाव खुर्द गावाकडे येत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानुसार पोलिसांनी भाम नदीवर सापळा लावला. नदीच्या पुलावर आल्यानंतर मांजरेला पोलिसांची चाहूल लागली. तो गाडीतून उतरून उसाच्या शेतात पळून गेला. पोलिसांनी शेताला घेराव घालून त्याला शिताफीने ताब्यात घेतले.

त्याच्याकडे एक देशी बनावटीचे पिस्टल आणि त्यात सहा जिवंत काडतुसे आढळली. त्याच्या कारची झडती घेतली असता त्यात तीन कोयते आणि एक तलवार आढळून आली. पोलिसांनी सर्व शस्त्रसाठा जप्त करून मांजरे याला अटक केली.

संतोष मांजरे हा सराईत गुन्हेगार आहे. त्याने 2013 साली दोन व्यक्तींचा कोयत्याने वार करून निर्घृण खून केला होता. त्यात त्याला अटक झाली होती. सन 2019 पर्यंत तो येरवडा कारागृहात होता. कारागृहातून बाहेर आल्यानंतर त्याने पुन्हा गुन्हेगारीचे सत्र सुरू केले. पोलिसांनी त्याची पुन्हा कारागृहात रवानगी केली आहे.

मांजरे याच्यावर पूर्वी दोन खुनाचे गुन्हे, दोन बेकायदा हत्यार बाळगण्याचे पूर्वी गुन्हे दाखल आहेत. त्याच्यावर आणखी दोन गुन्ह्यांची भर पडली आहे.

ही कारवाई पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश, अपर पोलीस आयुक्त रामनाथ पोकळे, पोलीस उप आयुक्त मंचक इप्पर, सहाय्यक पोलीस आयुक्त गणेश बिरादार, पोलीस निरीक्षक अरविंद पवार यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक दत्ताञय गुळींग , उप निरीक्षक ज्ञानेश्वर दळवी, पोलीस हवालदार चंदु गवारी, राजु कोणकेरी, अमोल बोराटे, पवन वाजे, विठ्ठल वडेकर, शिवाजी लोखंडे, संतोष काळे, हिरामन सांगडे, शरद खैरे यांनी केली आहे.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.