Chakan Crime News : लसीकरणासाठी लाच; एकास रंगेहाथ अटक

चाकण ग्रामीण रुग्णालयातील प्रकार

एमपीसी न्यूज – चाकण ग्रामीण रुग्णालयातील लसीकरण केंद्रावर कोरोना लस घेण्यासाठी 400 रुपये स्वीकारताना एकास लाच लुचपत प्रतिबंधक विभागा कडून रंगेहाथ ताब्यात घेण्यात आले आहे.

चाकण ग्रामीण रुग्णालयात गुरुवारी (दि.26 ऑगस्ट ) दुपारी दोनच्या सुमारास ही कारवाई करण्यात आली आहे. सचिन अरुण शिंदे राहणार रासे , ता. खेड, जि .पुणे असे अटक करण्यात आलेल्या इसमाचे नाव आहे. संबंधित इसम येथील लसीकरण केंद्रावर गर्दीवर नियंत्रण ठेवण्याचे काम मागील काही दिवसांपासून करीत होता. चारशे रुपयांची लाच घेताना अटक केलेला इसम ग्रामीण रुग्णालयात कंत्राटी पद्धतीने काही दिवसापूर्वी नेमणुकीस होता. सध्या तो चाकण ग्रामीण रुग्णालयात अधिकृतपणे नेमणुकीस होता का हे अद्याप स्पष्ट झालेले नाही.

लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने चाकण ग्रामीण रुग्णालयाच्या प्रवेश द्वारावरच एका तक्रार दाराकडून 400 रुपये स्वीकारले असल्याची माहिती समोर येत आहे. ताब्यात घेण्यात आलेल्या शिंदे यास गुन्हा दाखल करण्यासाठी चाकण पोलीस ठाण्यात नेण्यात आले आहे. चाकण पोलीस ठाण्यात उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्याची कार्यवाही सुरू होती. दरम्यान या घटनेनंतर चाकण ग्रामीण रुग्णालयातील लसीकरण दुपारनंतर बंद करण्यात आले आहे. या प्रकरणी आणखी काही जणांची चौकशी पोलिसांकडून सुरु आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.