Chakan : कामगारांना लुटण्याच्या तयारीत असलेल्या टोळीचा डाव पोलिसांनी उधळला

एमपीसी न्यूज – कंपनीतील कामगारांना चाकू आणि कोयत्याचा धाक दाखवून त्यांच्याकडील रोख रक्कम आणि मौल्यवान वस्तू लुटण्याच्या तयारी असलेल्या टोळीचा डाव चाकण पोलिसांनी उधळून लावला. टोळीतील दोघांना पोलिसांनी अटक केली आहे. आरोपींकडून 5 लाख 5 हजार 750 रुपयांचा ऐवज जप्त करण्यात आला आहे. ही कारवाई चाकणमधील आंबेठाण चौकात मंगळवारी पहाटे पावणेदोनच्या सुमारास केली.

निखिल रतन कांबळे (वय 19, रा. खंडोबा माळ, चाकण), ओमकार मनोज बिसनारे (वय 19, रा. चाकण) अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत. तर अविनाश गंगाराम भिसे (रा. राणूबाई मळा, ता. खेड), रामदास सुखदेव घोडके (रा. आंबेडकर नगर, चाकण), महेश शिंदे (रा. रासे, ता. खेड) हे तीन आरोपी फरार आहेत. याप्रकरणी पोलीस शिपाई संदीप भीमा रावते यांनी चाकण पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सर्व आरोपी मंगळवारी पहाटे पावणेदोनच्या सुमारास स्विफ्ट कार (एम एच 12 / एल पी 5220) आणि दरोड्याचे साहित्य घेऊन चाकण मधील आंबेठाण चौकात थांबले होते. कंपनीमधून येणा-या कामगारांना चाकू आणि कोयत्याचा धाक दाखवून त्यांच्याकडील पैसे आणि मौल्यवान वस्तू लुटण्याचा त्यांचा डाव होता. चाकण पोलिसांना याबाबत माहिती मिळताच आंबेठाण चौकात जाऊन आरोपींचा पाठलाग करून दोघांना पकडले. तर इतर तीनजण पळून गेले. पकडलेल्या आरोपींकडून स्विफ्ट कार, चाकू, कोयता, मोबाईल फोन, मिरची पूड असा एकूण 5 लाख 5 हजार 750 रुपयांचा ऐवज जप्त करण्यात आला आहे. चाकण पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.