Chakan Crime News : भांडी स्वच्छ करण्याची पावडर असल्याचे सांगून अगोदर चांदीची मूर्ती साफ केली नंतर सोन्याचे दागिने पळवले

एमपीसी न्यूज – आमच्याकडे भांडी साफ करण्याची पावडर असल्याचे सांगून दोघांनी एका महिलेची चांदीची मूर्ती साफ करून दिली. महिलेचा विश्वास संपादन करून तिच्याकडून सोन्याचे दागिने साफ करण्यासाठी घेऊन दोघेजण निघून गेले. याबाबत महिलेने फसवणुकीची फिर्याद दिली आहे. ही घटना 26 ऑगस्ट रोजी सकाळी राजे शिव छत्रपती हाऊसिंग सोसायटी, येलवाडी येथे घडली.

याप्रकरणी महिलेने गुरुवारी (दि. 16) चाकण पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार दोन अनोळखी व्यक्तीच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, 26 ऑगस्ट रोजी सकाळी साडेदहा वाजताच्या सुमारास दोन अनोळखी व्यक्ती फिर्यादी यांच्या घरी आले. ‘आम्ही भांडी साफ करण्याची पावडर विकण्यासाठी आलो आहोत. तुमची भांडी साफ करून देतो. तुमच्याकडे भांडी असतील तर द्या’ असे म्हणून आरोपींनी फिर्यादी महिलेचा विश्वास संपादन केला.

महिलेने चांदीची गणपतीची मूर्ती आरोपींना साफ कारण्यासाठी दिली. आरोपींनी गणपतीची मूर्ती साफ करून दिली. त्यानंतर आरोपींनी ‘आमच्याकडे सोन्याचे दागिने साफ करून देण्याची पावडर’ असल्याचे महिलेला सांगितले. महिलेने घरातील 65 हजार रुपये किमतीचे 16 ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने आरोपींकडे साफ करण्यासाठी दिले. आरोपी फिर्यादी महिलेचा विश्वासघात करून सोन्याचे दागिने घेऊन निघून गेले. चाकण पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.