Chakan Crime News : शासकीय रुग्णालयातील डॉक्टर, सुरक्षारक्षकासह पोलिसाला मारहाण; मद्यपी दोघांना अटक

एमपीसी न्यूज – मद्य प्राशन करून दोन तरुणांनी शासकीय रुग्णालयातील डॉक्टर, सुरक्षा रक्षक यांना मारहाण केली. तसेच पोलीस कर्मचाऱ्याला देखील मारहाण केली. याप्रकरणी दोन मद्यपी तरुणांना पोलिसांनी अटक केली आहे. ही घटना सोमवारी (दि. 8) रात्री पावणे एक वाजताच्या सुमारास चाकण ग्रामीण रुग्णालयात घडली.

श्रीकांत घनश्याम अंबोरे (वय 24), कन्हैया यादव ढवळे (वय 24, दोघे रा. खराबवाडी, ता. खेड. मूळ रा. टाकळगाव, ता. वसमत, जि. हिंगोली) अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत. याबाबत डॉ. विनायक ज्ञानेश्वर मोहोळे (वय 25, रा. चाकण ग्रामीण रुग्णालय. मूळ रा. कुरुल, ता. मोहोळ, जि. सोलापूर) यांनी चाकण पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

_MPC_DIR_MPU_II

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी डॉ. मोहोळे चाकण ग्रामीण रुग्णालयात काम करतात. सोमवारी रात्री पावणे एक वाजता डॉ. मोहोळे आणि त्यांचे सहकारी डॉक्टर रुग्णालयात उपस्थित होते. त्यावेळी दोघे आरोपी मद्य प्राशन करून रुग्णालयात आले. आरोपींनी डॉ. मोहोळे यांना धक्काबुक्की करत मारहाण केली.

त्यानंतर रुग्णालयातील सुरक्षा रक्षक ज्ञानेश्वर हिवराळे यांना धक्काबुक्की करून आरोपींनी मारहाण केली. रुग्णालयात उपस्थित असलेले पोलीस कर्मचारी बजरंग साबळे यांना देखील आरोपींनी शिवीगाळ करत हातातील कड्याने आणि दगडाने मारहाण करून जखमी केले.

पोलिसांनी दोघा मद्यपी आरोपींच्या विरोधात भारतीय दंड विधान कलम 353, 332, 34, महाराष्ट्र दारूबंदी अधिनियम1985, महाराष्ट्र वैद्यकीय सेवा संस्था हिंसक कृत्य व मालमत्तेची हानी व नुकसान यांना प्रतिबंध अधिनियम कलम 4 नुसार गुन्हा दाखल केला आहे. दोघांना पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. चाकण पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.