Chakan Crime News : शिवसेना नगरसेवकाच्या विरोधात विनयभंगाचा गुन्हा दाखल

एमपीसी न्यूज – शिवसेना नगरसेवकाच्या विरोधात विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा प्रकार 31 ऑगस्ट 2021 रोजी चाकण येथे घडला आहे. यापूर्वी नगरसेवकाने चाकण पोलीस ठाण्यात खंडणीची फिर्याद दिली आहे. त्यात एका महिलेने नगरसेवकाला विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्याची धमकी दिली असल्याचे म्हटले होते.

किशोर शेवकरी (रा. चाकण) असे गुन्हा दाखल झालेल्या नगरसेवकाचे नाव आहे. याबाबत पीडित महिलेने बुधवारी (दि. 15) चाकण पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी महिला राहत असलेल्या घराच्या पार्किंग मध्ये येऊन आरोपीने रात्री साडेदहा ते अकरा वाजताच्या सुमारास फिर्यादी महिलेला शिवीगाळ केली. फिर्यादीला पार्किंग मध्ये बोलावून त्यांच्याशी गैरवर्तन करत विनयभंग केला असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. चाकण पोलीस तपास करीत आहेत.

मागील दोन दिवसांपूर्वी याच नगरसेवकाने चाकण पोलीस ठाण्यात खंडणीची फिर्याद दिली आहे. त्यानुसार नऊ जणांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यामध्ये एका पत्रकाराचा देखील समावेश आहे. या नऊ जणांनी टोळी बनवून शेवकरी यांना समाजात बदनाम करण्याच्या उद्देशाने एका महिलेला शेवकरी यांच्या विरोधात विनयभंगाची खोटी तक्रार देण्यासाठी वारंवार चाकण पोलीस ठाण्यात पाठवले. हे प्रकरण मिटविण्यासाठी फिर्यादी यांच्याकडे आरोपींनी सुरुवातीला 15 लाख रुपये त्यानंतर तडजोड करून 12 लाख रुपये खंडणी मागितली.

त्यानंतर आणखी तडजोड करून आरोपींनी पाच लाख रुपये आणि विनयभंगाची तक्रार देण्यासाठी पाठवलेल्या महिलेच्या कॅन्सरच्या सर्जरीसाठी खर्च करण्याची मागणी केली असल्याचे शेवकरी यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.