Chakan Crime News : विवाहितेच्या छळ प्रकरणी पाच जणांवर गुन्हा दाखल

एमपीसी न्यूज – अविवाहित असल्याचे खोटे सांगून विवाहितेला पहिल्या पतीपासून घटस्फोट घेण्यास भाग पाडले. त्यानंतर तिच्याशी विवाह केला. मात्र तिला घरी नेले नाही. सासरी घरी नेण्यासाठी विवाहितेकडे पैशांची मागणी केली. तिचा लैंगिक छळ केला. महिलेला व तिच्या मुलीला ठार मारण्याची धमकी दिली. याप्रकरणी पती, त्याचे वडील आणि तीन महिलांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याप्रकरणी 34 वर्षीय महिलेने चाकण पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. ही घटना 26 मे ते 25 सप्टेंबर 2021 या कालावधीत घडली.

पोलिसांनी दिलेल्या माहीतीनुसार, आरोपी पतीने तो अविवाहित असल्याचे सांगून एका विवाहित महिलेला तिच्या पहिल्या पतीपासून घटस्फोट घेण्यास भाग पाडले. त्यानंतर तो विवाहित असतानाही महिलेसोबत आळंदी येथील एका मंगल कार्यालयात लग्न केले. लग्नानंतर सासरी घेऊन जाण्याबाबत वारंवार सांगूनही महिलेला उडवाउडवीची उत्तरे देऊन पतीने त्यासाठी टाळाटाळ केली.

विवाहितेला आणि तिच्या मुलीला जीवे मारण्याची धमकी देऊन सासरी नांदण्यासाठी घेऊन जाण्यासाठी विवाहितेकडे पैशांची मागणी केली. 13 जुलै ते 16 जुलै या कालावधीत पतीने विवाहितेचा लैंगिक छळ केला. पतीचे वडील आणि तीन महिलांनी आपसात संगनमत करून विवाहितेला मारहाण, शिवीगाळ, दमदाटी केली असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. चाकण पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.