Chakan Crime News: चाकणचे माजी सरपंच दत्तात्रेय बिरदवडे यांना अटक

गंभीर गुन्हा दाखल झाल्यानंतर होते फरारी, दोन दिवसांची कोठडी

एमपीसी न्यूज – परस्परविरोधी तक्रारीत गंभीर मारहाण प्रकरणी गुन्हा दाखल असलेले व गेली चार महिने फरारी असलेले चाकणचे माजी सरपंच दतात्रेय बिरदवडे यांना शुक्रवारी (दि. ३० ) रात्री अकराच्या सुमारास अटक करण्यात आली आहे.

पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयाच्या गुन्हे शाखा युनिट तीनच्या पथकाने त्यांना चाकण मधून ताब्यात घेतले.

चाकणमधील राणूबाई मळा भागात सरपंच बिरदवडे यांचे स्थानिकांशी वाद झाले होते. या मध्ये परस्परविरोधी तक्रारी देण्यात आल्या होत्या. त्यात एका गटावर खुनाच्या प्रयत्नाचा तर दुसऱ्या गटावर दरोड्याच्या प्रयत्नाचा गुन्हा दाखल होता.

माजी सरपंच बिरदवडे यांच्या कुटुंबातील सात जणांवर चाकण पोलिसांत गुन्हे दाखल करण्यात आले होते. तेंव्हापासून बिरदवडे फरारी होते. दरम्यान त्यांनी अटकपूर्व जमीन मिळवण्यासाठी खूप प्रयत्न केले होते. मात्र त्यांना अटकपूर्व  जमीन मिळाला नव्हता.

माजी सरपंच दतात्रेय बिरदवडे चाकण मध्ये असल्याची माहिती त्यांच्या विरोधात पोलिसांत तक्रार देणाऱ्या गटाला शुक्रवारी रात्री मिळाली. त्यानंतर या बाबत थेट पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयातील गुन्हे शाखेला याची माहिती देण्यात आली.

स्थानिकांनी पकडून माजी सरपंच बिरदवडे यांना पोलिसांच्या हवाली केले. माजी सरपंचाना पकडून पोलिसांच्या हवाली करण्याचे आल्याचे व्हिडीओ चाकण मध्ये सोशल माध्यमात रात्री पासून मोठ्या प्रमाणावर फिरत होते.

दरम्यान रात्री माजी सरपंच बिरदवडे यांना अटक केल्यानंतर शनिवारी (दि. 31) सकाळी त्यांचे भाऊ संतोष बिरदवडे यांनाही पोलिसांनी अटक केली. या दोघांना न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्यांना दोन दिवस (3 नोव्हेंबरपर्यंत) पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले आहेत.

चाकण पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रकाश धस पुढील तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.