Chakan crime News : सामाजिक सुरक्षा विभागाच्या चाकण, वाकड येथील कारवायांमध्ये 13 लाखांचा गुटखा जप्त

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड सामाजिक सुरक्षा विभागाने चाकण आणि वाकड परिसरात दोन ठिकाणी कारवाया करत 13 लाख 29 हजार 251 रुपये किमतीच्या गुटख्यासह 36 लाख 79 हजार 916 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.

नरसिंह कॉलनी, ताथवडे येथे दलपत पत्ताराम भाटी (वय 27, रा. थेरगाव) याने त्याच्या भाड्याच्या खोलीत गुटख्याची साठवणूक केली आहे. त्या गुटख्याची स्कोडाकार मधून वाहतूक करून विक्री करणार असल्याची माहिती सामाजिक सुरक्षा विभागाला मिळाली. त्यानुसार पथकाने मंगळवारी (दि. 22) सापळा लावून दुपारी पावणे चार वाजता सापळा लावून कारवाई केली.

या कारवाईमध्ये पोलिसांनी 8 हजार 450 रुपये रोख रक्कम, 7 लाख 52 हजार 242 रुपये किमतीचा गुटखा, 7 लाख 20 हजारांची स्कोडा कार, 35 हजारांचा ॲपल कंपनीचा मोबाईल फोन, असा एकूण 15 लाख 15 हजार 692 रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला.

याबाबत वाकड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सामाजिक सुरक्षा विभागाने चाकण परिसरातील खालूंब्रे येथे आणखी एक कारवाई केली. ही कारवाई मंगळवारी (दि. 22) दुपारी सव्वातीन वाजता चाकण-तळेगाव रोडवर खालूंब्रे येथे करण्यात आली. यात रामाराम करनाराम जाट (वय 24, रा. खालूंब्रे, ता. खेड), दिनेश भवरलाल भाटी (वय 24), मांगीलाल लख्खाराम चौधरी (वय 22, रा. सुदर्शननगर, चिंचवड), ओमप्रकाश वीरमाराम विष्णोई (रा. खालूंब्रे) यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

आरोपींनी बालाजी ट्रेडिंग कंपनी या दुकानात प्रतिबंधित गुटखा साठवून ठेवला होता. त्यावर पोलिसांनी छापा मारून कारवाई केली.

या कारवाईमध्ये पोलिसांनी पाच लाख 77 हजार 9 रुपये किमतीचा गुटखा, तंबाखू, सिगारेट, 72 हजार 215 रुपये रोख रक्कम, 16 लाख 50 हजार रुपये किमतीची तीन वाहने, 65 हजारांचे तीन मोबाईल फोन असा एकूण 21 लाख 64 हजार 224 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.