Chakan Crime News : सिलेंडरमधील गॅस चोरी प्रकरणी चाकण परिसरात दोन ठिकाणी कारवाया

एमपीसी न्यूज – भरलेल्या सिलेंडर मधून गॅसची चोरी होणाऱ्या दोन ठिकाणी पिंपरी -चिंचवड पोलिसांनी छापे मारून कारवाई केली. दोन्ही कारवायांमध्ये चार जणांना अटक केली. आहे. पिंपरी-चिंचवड गुन्हे शाखा युनिट तीन आणि सामाजिक सुरक्षा पथकाने या कारवाया केल्या आहेत.

गुन्हे शाखा युनिट तीनने केलेल्या कारवाईमध्ये सुभाष हिरकणराम बिष्णोई (वय 28, रा. महाळुंगे, ता. खेड. मूळ रा. राजस्थान), जगदीश कवरलाल जांगु (वय 24, रा. महाळुंगे, ता. खेड. मूळ रा. राजस्थान) या दोघांना अटक करण्यात आली आहे. याबाबत पोलीस शिपाई प्रमोद ढाकणे यांनी चाकण पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, महाळुंगे येथे सदानंद कांबळे यांच्या शेताकडे जाणाऱ्या कच्च्या रस्त्यावर आरोपी घरगुती भरलेल्या सिलेंडर मधून व्यावसायिक व घरगुती गॅस सिलेंडरमध्ये गॅस काढून चोरी करत असल्याची माहिती गुन्हे शाखा युनिट तीनच्या पोलिसांना मिळाली. त्यानुसार, गुरुवारी सकाळी अकरा वाजताच्या सुमारास पोलिसांनी कारवाई करत दोघांना ताब्यात घेतले. दोघेजण लोकांच्या जीवाला धोका निर्माण होईल अशा प्रकारे भरलेल्या सिलेंडर मधून गॅस काढून चोरी करत होते. त्यांच्याकडून टेम्पो, 18 सिलेंडर टाक्या, इतर साहित्य असा एकूण तीन लाख 28 हजार 678 रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे.

सामाजिक सुरक्षा पथकाने केलेल्या कारवाईमध्ये राजेंद्र काशिनाथ पवार (वय 60, रा. बालाजीनगर, चाकण), किरण मारुती पवार (वय 25, रा. चाकण) या दोघांना अटक करण्यात आली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मच्छी मार्केट, माणिक चौक, चाकण येथील सोमेश्वर स्टील सेंटर अँड गॅस सर्व्हिस सेंटर या दुकानाचा मालक दुकानाच्या पाठीमागील बाजूला भरलेल्या गॅस सिलेंडर मधून गॅस चोरून तो लहान गॅस सिलेंडर टाक्यांमध्ये भारत आहे, अशी माहिती सामाजिक सुरक्षा विभागाला मिळाली. त्यानुसार पोलिसांनी छापा मारून कारवाई केली. यात पोलिसांनी 46 हजार 620 रुपये रोख रक्कम, एक हजार 333 रुपयांचे गॅस भरण्याचे साहित्य, पाच हजारांचा एक इलेक्ट्रिक वजन काटा, दोन लाख 60 हजार 76 रुपयांचे गॅस सिलेंडर, पाच लाख 90 हजारांचे एक पीकअप वाहन जप्त करण्यात आले आहे. चाकण पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.