Chakan Crime News : कपड्याचे दुकान फोडून एक लाखाचे कपडे चोरून नेणाऱ्यास अटक

एमपीसी न्यूज – शेल पिंपळगाव येथील जय हनुमान कलेक्शन या कपडयाचे दुकानाचा पाठीमागील पत्रा कापून उचकटून दुकानातून सुमारे एक लाख रुपयांचे कपडे चोरून नेल्याचा प्रकार 18 जून रोजी घडला होता. या कपडे चोरास चाकण पोलिसांनी अटक केली आहे. त्याच्याकडून चोरलेले सर्व कपडे जप्त करण्यात आले आहेत.

सचिन मधुकर वाघ (वय 30, रा. राम मंदिराजवळ, वडगाव रोड, आळंदी, ता. खेड, जि. पुणे) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. याप्रकरणी राजाराम नारायण आलम (रा. बहुळ, ता. खेड, जि. पुणे) यांनी चाकण पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, राजाराम आलम यांचे शेल पिंपळगावातील शेलगाव फाटा येथे जय हनुमान कलेक्शन नावाचे कपड्यांचे दुकान आहे. 18 जून रोजी रात्रीच्या वेळी चोरट्यांनी दुकानाच्या पाठीमागील पत्रा कापून आत प्रवेश केला. चोरट्यांनी दुकानातून सुमारे एक लाख रुपये किमतीचे वेगवेगळ्या प्रकारचे कपडे चोरुन नेले.

चाकण पोलिसांनी घटनास्थळाची पाहणी करून परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासले. त्यामध्ये पोलिसांना एक टेम्पो (एमएच 14 / सीपी 3191) संशयितरित्या आढळून आला. त्यानुसार पोलिसांनी टेम्पो मालक सचिन वाघ याला ताब्यात घेतले. त्याच्याकडे चौकशी केली असता त्याने सुरुवातीला उडवाउडवीची उत्तरे दिली. त्यानंतर कसून चौकशी केली असता त्याने हा गुन्हा केल्याचे कबूल केले.

सचिन वाघ याला 21 जून रोजी अटक करून न्यायालयात हजर केले. न्यायालयाने आरोपीला 25 जून पर्यंत पोलीस कोठडी सुनावली. पोलीस कोठडीत असताना त्याच्याकडे चौकशी केली असता त्याने हा गुन्हा त्याच्या शिवा (पूर्ण नाव पत्ता माहिती नाही) नावाच्या साथीदारासोबत मिळून केल्याचे सांगितले.

कपड्यांच्या दुकानातून चोरलेले कपडे सचिन याने त्याच्या टेम्पोतून वाहून नेले. पोलिसांनी चोरीला गेलेले कपडे आणि टेम्पो असा एकूण दोन लाखांचा मुद्देमाल जप्त केला आहे. सचिनचा साथीदार शिवा याचा पोलीस शोध घेत आहेत.

ही कारवाई पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश, अपर पोलीस आयुक्त. रामनाथ पोकळे, पोलीस उप आयुक्त (परिमंडळ 1) मंचक इप्पर, सहाय्यक पोलीस आयुक्त प्रेरणा कट्टे यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक अशोक राजपूत, सहायक पोलीस निरीक्षक विक्रम गायकवाड, पोलीस अंमलदार सुरेश हिंगे, राजु जाधव, हनुमंत कांबळे, संदिप सोनवणे, नितीन गुंजाळ, निखील वर्पे, अशोक दिवटे, प्रदिप राळे, विलास कांदे, सुप्रिया गायकवाड यांनी केली आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.