Chakan crime News : सराईत वाहनचोराला चाकण पोलिसांकडून अटक; सहा गुन्ह्यांची उकल

एमपीसी न्यूज – चाकण पोलिसांनी एका सराईत वाहनचोराला अटक केली आहे. सहा गुन्ह्यांची उकल करण्यात पोलिसांना यश आले असून त्याच्याकडून चोरी केलेल्या सहा दुचाकी जप्त करण्यात आल्या आहेत.

अजय बबन गायकवाड (वय 19, रा. काळूस, ता. खेड) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे.

सराईत गुन्हेगार अजय गायकवाड हा चोरीची मोटार सायकल विक्रीसाठी येणार असल्याची माहिती पोलीस उपनिरीक्षक विजय जगदाळे यांना माहिती मिळाली.

_MPC_DIR_MPU_II

त्यानुसार पोलिसांनी सापळा लावून आरोपी अजय याला ताब्यात घेतले. त्याच्याकडे असलेल्या दुचाकीबाबत चौकशी केली असता ती दुचाकी चोरीची असल्याचे त्याने सांगितले.

त्याला अटक करून आणखी तपास केला असता त्याने चाकण, शिक्रापूर आणि एमआयडीसी भोसरी परिसरातून सहा वाहने चोरल्याचे सांगितले. पोलिसांनी त्याच्याकडून 1 लाख 35 हजारांच्या सहा दुचाकी जप्त केल्या आहेत.

आरोपी अजय हा सराईत गुन्हेगार आहे. त्याच्यावर यापूर्वी चाकण व खेड पोलीस ठाण्यात जबरी चोरीचे तीन गुन्हे दाखल आहेत. या कारवाईमुळे चाकणमधील चार, एमआयडीसी भोसरी आणि शिक्रापूर पोलीस ठाण्यातील प्रत्येकी एक असे एकूण सहा गुन्हयांची उकल झाली आहे.

ही कारवाई पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश, अपर पोलीस आयुक्त रामनाथ पोकळे, पोलीस उप आयुक्त सुधीर हिरेमठ, सहाय्यक पोलीस आयुक्त रामचंद्र जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रकाश धस, गुन्हे शोध पथकाचे पोलीस उप निरीक्षक विजय जगदाळे, पोलीस कर्मचारी सुरेश हिंगे, संदिप सोनवणे, हनुमंत कांबळे, अनिल गोरड, निखल वर्षे, मनोज साबळे, अशोक दिवटे, नितीन गुंजाळ, प्रदिप राळे, मच्छिंद्र भांबुरे यांनी केली आहे.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.