Chakan crime News : जमिनीची हद्द कायम करण्यासाठी आलेल्या भूकरमापक महिलांना धक्काबुक्की, शिवीगाळ

आठ जणांवर सरकारी कामात अडथळा आणल्याचा गुन्हा दाखल

एमपीसी न्यूज – शासकीय मोजणी केल्यानंतर हद्द कायम करण्यासाठी आलेल्या भूकरमापक महिलांना शिवीगाळ आणि धक्काबुक्की केली. तसेच त्यांच्यासोबत असलेल्या कामगारांना काठ्या आणि दगडाने मारहाण केली. याबाबत आठ जणांविरोधात सरकारी कामात अडथळा आणल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना मंगळवारी (दि. 22) दुपारी बारा वाजता खेड तालुक्यातील रासे येथे घडली.

भूकरमापक पूजा अजय सानप (वय 27, रा. राजगुरूनगर) यांनी याबाबत चाकण पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

त्यानुसार पोलिसांनी संपत उदाराम लोणारी, अतिश हनुमंत लोणारी, प्रकाश संतराम लोणारी, विलास उदाराम लोणारी, विकास विश्राम लोणारी, अमित हनुमंत लोणारी, विनीत विकास लोणारी, आकाश प्रकाश लोणारी (सर्व रा. रासे, ता. खेड) यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी पूजा सानप या भूमी अभिलेख कार्यालय खेड येथे भूकरमापक म्हणून नेमणुकीस आहेत.

सानप आणि भूकरमापक अन्नपूर्णा मधुकर चपाईतकर त्यांच्या दैनंदिन रोजंदारीवरील मदतनीस किरण चंद्रकांत काळे (वय 39) आणि सचिन गुलाब नाईकरे (वय 34) यांच्यासह रासे येथील विश्राम सदू लोणारी यांच्या जमिनीवर 19 ऑक्टोबर रोजी केलेल्या शासकीय मोजणीची हद्द कायम करत होत्या.

त्यावेळी आरोपी संपत तिथे आला. ‘तुम्ही आमच्या क्षेत्राची चुकीची हद्द दाखवताय. ती आम्हाला मान्य नाही’ असे म्हणून त्याने फिर्यादी यांना शिवीगाळ, दमदाटी केली.

त्यानंतर सर्व आरोपींनी फिर्यादी व त्यांच्या सहकारी भूकरमापक यांना हातात काठ्या व दगड घेऊन शिवीगाळ, दमदाटी करत धक्काबुक्की केली. फिर्यादी यांच्या हातातील मोजणीचा टेप हिसकावून घेतला.

मोजणी करण्यासाठी आलेले मदतनीस किरण काळे आणि सचिन नाईकरे यांना आरोपींनी काठीने, दगडाने व लाथाबुक्क्यांनी मारहाण करून दुखापत केली. याबाबत चाकण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

चाकण पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.