Chakan Crime News : चाकण परिसरातील दोन कंपन्यांमध्ये चोरी

एमपीसी न्यूज – चाकण परिसरातील दोन कंपन्यांमध्ये चोरी झाली आहे. चोरीची पहिली घटना खराबवाडी येथे तर दुसरी घटना भांबोली येथे घडली. याबाबत मंगळवारी (दि. 16) चाकण पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

पहिल्या प्रकरणात अमोल मधुकर नितनवरे (वय 34, रा. वडगाव घेनंद, ता. खेड) यांनी फिर्याद दिली आहे. फिर्यादी यांचे खराबवाडी येथे वेअर हाऊस आहे. त्या वेअर हाऊस मध्ये पल्सार दुचाकीचे कार्बोरेटर स्टोअर करून ठेवण्यात आले होते. 13 मार्च ते 15 मार्च 2021 या कालावधीत अज्ञात चोरट्यांनी वेअर हाऊसच्या बाजूचे गज कापून शेडमध्ये प्रवेश केला. आतमधून दोन लाख 95 हजार 429 रुपयांचे कार्बोरेटर चोरून नेले.

दुसऱ्या प्रकरणात माणिक शिवाजी घनवट (वय 53, रा. भोसरी) यांनी फिर्याद दिली आहे. फिर्यादी यांची भांबोली चाकण फेज दोन येथे गौरव प्रेसिंग ही कंपनी आहे. कंपनीचे फॅब्रिकेशन शेड तयार करण्यासाठी घनवट यांनी लोखंडी मटेरियल कंपनीत ठेवले होते.

रविवारी (दि. 14) रात्री साडेसात ते सोमवारी (दि. 15) सकाळी नऊ या कालावधीत अज्ञात चोरट्यांनी मटेरियल ठेवलेल्या गेटचे कुलूप तोडून आत प्रवेश केला. कंपनीमधून एक लाख 84 हजार 365 रुपयांचे मटेरियल चोरून नेले. दोन्ही गुन्ह्यांचा तपास चाकण पोलीस करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.