Chakan Crime News : कामावरून काढल्याने महिलेकडून कंपनीच्या प्लांट हेडला धमकी, केबिनची तोडफोड

एमपीसी न्यूज – कंपनीतून कामावरून काढून टाकल्याचा रागातून कामगार महिलेने तिच्या दोन साथीदारांना कंपनीत आणून प्लांट हेडला धमकावले. तसेच प्लांट हेडच्या केबिनमध्ये तोडफोड करून एका व्यक्तीला काचेने मारून जखमी केले. ही घटना बुधवारी (दि. 12) दुपारी नाणेकरवाडी येथील आयएआय इंडस्ट्रीज लिमिटेड या कंपनीत घडली.

कविता सुरेश मुळे, विशाल सुरेश मुळे, शुभम युवराज सरोदे (सर्व रा. नाणेकरवाडी, ता. खेड) अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत. याबाबत विक्रम चंद्रकांत वाघ (वय 40, रा. मोशी) यांनी चाकण पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी कविता आयएआय इंडस्ट्रीज लिमिटेड या कंपनीत सिक्युरिटी गार्ड म्हणून कामावर होती. तिला कामावरून काढण्यात आले. त्या कारणावरून तिने अन्य दोन साथीदारांना घेऊन बुधवारी दुपारी अडीच वाजता कंपनीत प्रवेश केला. कंपनीचे प्लांट हेड अनुपम गंगवार यांच्या केबिनमध्ये घुसून त्यांना शिवीगाळ व दमदाटी केली.

‘तू कंपनीच्या बाहेर चल तुझ्याकडे बघतो’, असे म्हणत प्लांट हेड यांना धमकी दिली. फिर्यादी हे आरोपींना समजावून सांगत असताना विशाल मुळे याने प्लांट हेडच्या केबिनची काच फोडली. आरोपी शुभम सरोदे याने फिर्यादी यांना हाताने व लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. तसेच फुटलेल्या काचेने फिर्यादी यांच्या नाकावर आणि हातावर मारून दुखापत केली.

चाकण पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.