Chakan Crime News : चोरीचा माल खरेदी केल्याप्रकरणी भाजप नगरसेविकेच्या पतीवर गुन्हा

एमपीसी न्यूज – कंपनीतून चोरलेला माल खरेदी केल्याप्रकरणी भाजप नगरसेविका कमल घोलप यांच्या पतीसह पाचजणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यातील तिघांना पोलिसांनी अटक केली आहे. ही घटना शुक्रवारी (दि. 29) सकाळी सावरदरी, खेड येथे उघडकीस आली.

इम्रान बागवान, इम्रान हुसेन, रणजित चौहान अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. तर नगरसेविकेचा पती बापू घोलप (रा. यमुनानगर, निगडी) आणि रशीद (पूर्ण नाव व पत्ता माहिती नाही) हे दोघे फरार झाले आहेत.

याप्रकरणी अमोल प्रकाश डोबळे (वय 36, रा. सावरदरी, चाकण) यांनी म्हाळुंगे पोलीस चौकीत फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, 20 डिसेंबर 2020 ते 29 जानेवारी 2021 या कालावधीत सावरदरी येथील एका खासगी कंपनीतून चोरट्यांनी दोन लाख 40 हजार रुपये किमतीचे साहित्य चोरून नेले.

या गुन्ह्याचा तपास करीत असताना पोलिसांनी सुरक्षारक्षक रणजित चौहान याला संशयावरून ताब्यात घेतले. त्याने गुन्ह्याची कबुली देत आरोपी बागवान आणि हुसेन यांना चोरीचा माल विकल्याचे पोलिसांना सांगितले.

त्यानुसार पोलिसांनी त्यांनाही अटक केली. त्यांच्याकडे केलेल्या चौकशीत त्यांनी फरार आरोपी बापू घोलप आणि रशीद यांना माल विक्री केल्याची कबुली दिली. त्यानुसार पोलीस त्या दोघांचा शोध घेत आहेत. म्हाळुंगे पोलीस तपास करीत आहेत.

ही कारवाई पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश, अपर आयुक्त रामनाथ पोकळे, उप आयुक्त मंचक इप्पर, सहाय्यक आयुक्त राम जाधव, पोलीस निरीक्षक अरविंद पवार यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक दत्तात्रय गुळींग, पोलीस अंमलदार चंदू गवारी, राजू कोणकेरी, अमोर बोराटे, पवन वाजे, विठ्ठल वडेकर, शिवाजी लोखंडे, संतोष काळे, हिरामण सांगडे यांच्या पथकाने केली.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.