Chakan Crime : चाकण पोलीस ठाण्यातील एका फौजदारावर दरोड्याचा गुन्हा

एमपीसी न्यूज – चाकण पोलीस ठाण्यातील एका फौजदारावर खंडणीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा फौजदार चोरट्यांशी संगनमत करून तो फौजदार चाकण परिसरातील कंपन्यांमध्ये चो-या करत असल्याचे समोर आले आहे.

एका कंटेनर चालकाला लुटल्याचा चाकण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल आहे. त्या गुन्ह्यात एका फौजदाराचा देखील समावेश असल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे. सुरुवातीला जबरी चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला होता, त्यानंतर त्यात खंडणीच्या गुन्ह्याची कलमवाढ करण्यात आली आहे.

विक्रम पासलकर असे गुन्हा दाखल झालेल्या फौजदाराचे नाव आहे.

वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रकाश धस यांनी दिलेल्या माहितीनुसार, एका कंपनीतून माल भरून दुस-या कंपनीत खाली करण्यासाठी जात असलेल्या कंटेनर चालकाला चाकूचा धाक दाखवून चार जणांनी मिळून आठ लाखांचा कंटेनर मधील माल जबरदस्तीने चोरून नेला. ही घटना 21 सप्टेंबर रोजी रात्री अकरा वाजता खेड तालुक्यातील संतोषनगर परिसरात घडली.

अंकुश लक्ष्मण केंद्रे (वय 40, रा. शिरसाठवाडी, ता. अहमदपूर, जि. लातूर) यांनी याप्रकरणी चाकण पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार चार अनोळखी चोरट्यांच्या विरोधात गुन्हा नोंदवण्यात आला होता.

फिर्यादी अंकुश त्यांच्या कंटेनरमध्ये (एम एच 12 / पी क्यू 5301) संतोषनगर येथील टाटा कंपनीच्या वेअर हाउस मधील स्पेअर पार्टचा माल भरून रोहकल येथील एका कंपनीच्या वेअर हाउसमध्ये खाली करण्यासाठी जात होते. 21 सप्टेंबर रोजी रात्री अकरा वाजताच्या सुमारास ते कंटेनर घेऊन जात असताना संतोषनगर येथील ठाकूर पिंपरी रोडवर अनोळखी चार चोरट्यांनी त्यांची दुचाकी कंटेनरला आडवी लावली आणि कंटेनर थांबवला.

त्यानंतर आरोपींनी फिर्यादी अंकुश यांना चाकूचा धाक दाखवून डोळ्याला रुमाल बांधला. चोरट्यांनी कंटेनर चालवत नेऊन त्यातील आठ लाख रुपयांचा स्पेअर पार्टचा माल जबरदस्तीने चोरून घेतला. तसेच आरोपींनी फिर्यादी अंकुश यांच्याकडील दीड हजारांची रोख रक्कम देखील चोरून नेली होती.

या गुन्ह्यात तो फौजदार दोषी आढळल्याने त्यालाही आरोपी करण्यात आले आहे. फौजदार पासलकर 2018 मध्ये चाकण पोलीस ठाण्यात तपास पथकाचा प्रमुख होता. त्यानंतर त्याची चाकण पोलीस ठाण्यांतर्गत असलेल्या म्हाळुंगे पोलीस चौकीत बदली करण्यात आली. तो फौजदार चोरट्यांशी हातमिळवणी करून परिसरातील कंपन्यांमध्ये चोऱ्या करत होता. गुन्हा दाखल झाल्यानंतर फौजदार पसार झाला आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.