Chakan Crime : चाकणजवळ 20 कोटींचा मेफेड्रॉन अंमली पदार्थाचा साठा जप्त; अंमली पदार्थ विरोधी पथकाची कारवाई

एमपीसी न्यूज – चाकण जवळ शेल पिंपळगावमध्ये बुधवारी (दि. 7) दुपारी पिंपरी चिंचवड गुन्हे शाखेच्या अंमली पदार्थ विरोधी पथकाने विक्रीसाठी आणलेला 20 कोटी रूपयांचा मेफेड्रॉन (एम.डी.) हा अंमली पदार्थ जप्त केला आहे. शहरातील आजपर्यंतची ही सर्वात मोठी कारवाई आहे.

चेतन फक्कड दंडवते (वय 28, रा. मलठण-आंबेवस्ती, ता. शिरुर) आनंदगीर मधुगिर गोसावी (वय 25, रा. जि. जळगाव. सध्या रा. अकोले, शिरुर), अक्षय शिवाजी काळे (वय 25, रा. पाचर्णे मळा, ता. शिरुर), संजिवकुमार बन्सी राऊत (वय 44, रा.झारखंड, सध्या रा. उत्तरप्रदेश), तौसिफ हसन मोहम्मद तस्लीम (वय 31, रा. मुजफ्फरनगर. सध्या रा. नोएडा) अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. याबाबत सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक शाकीर जिनेडी यांनी चाकण पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, काही जण अंमली पदार्थांची विक्री करण्यासाठी शेल पिंपळगाव येथे येणार आहेत, अशी माहिती पिंपरी चिंचवड गुन्हे शाखेच्या अंमली पदार्थ विरोधी पथकाला मिळाली. त्यानुसार बुधवारी दुपारी सापळा लावून पोलिसांनी पाच जणांना अटक केली.

त्यांच्याकडून 20 कोटी रुपयांचे मेफेड्रॉन (एम.डी.) हा अंमली पदार्थ जप्त केला. तसेच पाच लाख रुपये किमतीची कार आणि 23 हजार 100 रुपयांची रोकड असा एकूण 20 कोटी पाच लाख 23 हजार 100 रुपयांचा ऐवज पोलिसांनी जप्त केला आहे. अंमली पदार्थ विरोधी पथकाचे सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रशांत महाले तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.