Chakan: दत्तात्रय गायकवाड यांची भाजप कामगार आघाडीच्या पश्चिम महाराष्ट्र सहसंयोजकपदी नियुक्ती

Chakan: Appointment of Dattatraya Gaikwad as West Maharashtra Co-Coordinator of BJP Kamgar Aghadi

एमपीसी न्यूज – केहिन फाय एम्प्लॉईज युनियनचे माजी अध्यक्ष व विद्यमान सदस्य दत्तात्रय तथा भानुदास संभाजी गायकवाड यांची महाराष्ट्र प्रदेश भारतीय जनता पार्टी कामगार आघाडीच्या ‘पश्चिम महाराष्ट्र सहसंयोजक’ पदी निवड झाली आहे. गायकवाड यांच्या कामगार क्षेत्रातील कामगिरीची दखल घेऊन त्यांच्यावर ही जबाबदारी सोपविण्यात आली आहे.

गायकवाड यांना भारतीय जनता पार्टी कामगार आघाडी महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष गणेश ताठे यांच्याकडून तसे नियुक्तीचे पत्र देण्यात आले आहे.

नियुक्तपत्रामध्ये नमूद करण्यात आले आहे की, गेली अनेक वर्षे संघटित, असंघटीत कामगार क्षेत्रात कार्यरत राहून, कामगार चळवळ सक्षम आणि सशक्त करण्यासाठी महाराष्ट्राचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील, तसेच कामगार आघाडीचे मार्गदर्शक संजय  केनेकर आदिंना अभिप्रेत असणारी कामगार आघाडीची ध्येये धोरणे, कामगारांच्या समस्या व संघटनेने दिलेले कार्यक्रम कामगारांच्या शाश्वत विकासासाठी राबवून देशाच्या सर्वांगीण प्रगतीमध्ये कामगार वर्गाचे स्थान अधोरेखित करण्याची जबाबदारी गायकवाड यांच्यावर सोपवली आहे.

गायकवाड यांनी स्थानिक पातळीवर युनियनची उत्तमरित्या बांधणी करून कामगार वर्गात चांगले स्नेहाचे संबंध प्रस्थापित केले असून अध्यक्षपदाची जबाबदारी या आधीच्या काळात यशस्वीपणे सांभाळलेली आहे. आताही ते युनियनचे सदस्य असून अजातशत्रू म्हणून त्यांची ख्याती आहे.

गायकवाड हयांचा कामगार क्षेत्राबरोबरच सामाजिक, सांस्कृतिक, कला, क्रीडा व अध्यात्मिक क्षेत्रातही त्यांचा मोठा नावलौकिक असून गावातील श्रीपती बाबा पालखी दिंडी सोहळ्यात सक्रिय सहभाग असतो.

आगामी काळात कामगार आघाडीच्या माध्यमातून पक्षसंघटन मजबूत करण्यासाठी अथक परिश्रम घेऊन केंद्र व राज्य शासनाच्या कल्याणकारी योजना शेवटच्या घटकांपर्यंत पोहचविण्यासाठी विशेष प्रयत्न करणार असल्याचे  गायकवाड यांनी सांगितले.

त्यांच्या या निवडीबद्दल माजी मंत्री संजय तथा बाळा भेगडे व पुणे जिल्हा भारतीय जनता पक्षाचे अध्यक्ष गणेश भेगडे यांनी गायकवाड यांचे अभिनंदन करून पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. तसेच गायकवाड यांचे संपूर्ण खेड तालुक्यातील पंचक्रोशीत कौतुक व अभिनंदन होत आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.