Chakan : चाकण, देहूरोड, एमआयडीसी भोसरीमध्ये चार अपघात; चौघांचा मृत्यू

एमपीसी न्यूज – चाकण पोलीस ठाण्याच्या हद्दीत नाणेकरवाडी येथे एका ट्रकने दुचाकीस्वाराला धडक दिली. त्यात दुचाकीस्वाराचा मृत्यू झाला. तर देहूरोड पोलीस ठाण्याच्या हद्दीत एका बस चालकाने एका वृद्धाच्या दुचाकीला धडक दिली, त्यात दुचाकीस्वार वृद्धाचा मृत्यू झाला. एमआयडीसी भोसरी पोलीस ठाण्याच्या हद्दीत दोन अपघात झाले असून त्यात दोघांचा मृत्यू झाला आहे.

माधव काशिनाथ धबाले (वय 21, रा. खेड) असे नाणेकरवाडी येथील अपघातात मृत्यू झालेल्या दुचाकीस्वाराने नाव आहे. याप्रकरणी राजू संभाजी ढगे (वय 26, रा. कुरुळी, ता. खेड) यांनी अज्ञात ट्रक चालकाच्या विरोधात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मयत माधव हा बुधवारी पहाटे सव्वापाच वाजता त्याच्या दुचाकीवरून नाणेकरवाडी येथे चाकणकडून जात होता. अज्ञात ट्रकने दुचाकीला जोरात धडक दिली. त्यात माधवचा मृत्यू झाला. आरोपी ट्रक चालक अपघाताच्या ठिकाणी न थांबता घटनास्थळावरून पळून गेला. याप्रकरणी चाकण पोलीस तपास करीत आहेत.

अशिष अमूल्य दत्ता (वय 64, रा. विकासनगर, किवळे) असे देहूरोड येथील अपघातात मृत्यू झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. देवेंद्र अंकुश वालगुडे (वय 27, रा. कात्रज) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. पोलीस हवालदार सामील प्रकाश यांनी देहूरोड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अशिष दत्ता दुचाकीवरून सेंट्रल चौक ते सोमाटणेकडे दुचाकीवरून जात होते. त्यावेळी आरोपी बस चालकाने भरधाव वेगात बस चालवून त्यांच्या दुचाकीला धडक दिली. त्यात दत्ता यांचा मृत्यू झाला. देहूरोड पोलीस तपास करीत आहेत.

किशोर निवृत्ती भोले (वय 38), असे मोशी येथील अपघातात मृत्यू झालेल्या पादचाऱ्याचे नाव आहे. मयत किशोर भोले यांचा भाऊ आप्पासाहेब निवृत्ती भोले (वय 43, रा. संजय नगर, मोशी) यांनी या प्रकरणी बुधवारी (दि. 13) एमआयडीसी भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मयत किशोर भोले हे मंगळवारी (दि. 12) रात्री साडेनऊच्या सुमारास पायी चालत घरी जात होते. त्यावेळी पुणे- नाशिक महामार्गावर मोशी येथील गोल्डन पाम सोसायटी समोर अज्ञात वाहनाने किशोर भोले यांना धडक दिली. यात किशोर भोले यांचा मृत्यू झाला.

एमआयडीसी भोसरी पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या अपघाताच्या दुसऱ्या घटनेत रंजना नामदेव काकड (वय 40) या महिलेचा मृत्यू झाला. बाळासाहेब भास्कर उगलमुगले (वय 26, रा. शिवाजीवाडी, मोशी) यांनी या प्रकरणी बुधवारी (दि. 13) एमआयडीसी भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार कंटेनर चालकाच्या विरोधात पोलिसांनी गुन्हा दाखल केला.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मयत रंजना काकड या त्यांचा जावई फिर्यादी बाळासाहेब उगलमुगले यांच्यासोबत बुधवारी (दि. 13) दुचाकीवरून जात होत्या. त्यावेळी मोशी येथील भारत माता चौकात ते सिग्नलला थांबले असताना आरोपीच्या कंटेनरने फिर्यादीच्या गाडीला धडक दिली. त्यामुळे फिर्यादीच्या गाडीवरील फिर्यादीची सासू रंजना काकड खाली पडल्या. यात त्यांच्या डोक्याला मार लागून त्या जखमी झाल्या. यात रंजना काकड यांचा मृत्यू झाला. वरील दोन्ही गुन्ह्यांचा तपास एमआयडीसी भोसरी पोलीस करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.