Chakan : कर्जाऊ 2 लाखांच्या बदल्यात 7 लाखांची मागणी; पैसे न दिल्याने जागेवर जबरदस्तीने ताबा घेण्याचा प्रयत्न

महिलेवर खासगी सावकारीचा गुन्हा दाखल; चाकण पोलिसांची कारवाई

एमपीसी न्यूज – व्याजाने दिलेल्या दोन लाख रुपयांच्या बदल्यात सात लाख रुपयांची मागणी करत अधिकचे पैसे न दिल्याने जमिनीवर बळजबरीने ताबा घेतल्याप्रकरणी चाकण पोलीस ठाण्यात एका तथाकथित सामाजिक कार्यकर्त्या महिलेवर शनिवारी (दि. २७) खासगी सावकारीप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे.

उषा बाबुराव ऊनवणे (रा. महात्मा फुलेनगर, चाकण, ता. खेड, जि. पुणे) असे गुन्हा दाखल झालेल्या महिलेचे नाव आहे. याप्रकरणी आप्पा नागनाथ कांबळे (वय ३२ रा, झीत्राईमळा, गणेश नगर, चाकण, मूळ रा. सोलापूर) यांनी चाकण पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

  • याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी आप्पा कांबळे यांचे वडील नागनाथ विष्णू कांबळे आणि चुलते कुबेर कांबळे यांनी उषा उनवणे यांचेकडून व्याजाने घेतलेले दोन लाख रुपये त्यांना परत करण्यासाठी गेले होते. तेव्हा उनवणे यांनी संबंधितांना सांगितले की, मी दिलेल्या दोन लाखांचे व्याजासह सात लाख रुपये होत आहेत. सात लाख रुपये मला दिले तरच तुमची जागा सोडेल, अन्यथा नाही.

तेव्हा कांबळे कुटुंबीयांनी सांगितले की, तुमचे काय व्यवहाराने असतील ते पैसे आम्ही तुम्हाला परत देत आहोत, आमची जागा परत द्या, मात्र सोनवणे यांनी त्यांचे काही एक ऐकले नाही . त्यानंतर सदर दोन लाख रुपयांच्या बदल्यात फिर्यादी कांबळे यांचे चुलते कुबेर कांबळे यांचे नावे असलेल्या फिर्यादीने तारण घेत ठेवलेल्या जागेवर उनवणे यांनी कंपाउंड करून कब्जा केला.

  • याबाबत चाकण पोलीस महाराष्ट्र सावकारी अधिनियमान्वये गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास चाकण पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक सुनिल पवार यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.