Chakan Double Murder : चाकण दुहेरी हत्याकांड; ‘त्या’ दोघांना गरम सळई आणि दांडक्याने मारले

जीव गेल्याची खात्री झाल्यावर एका आरोपीने केला पोलिसांना फोन

एमपीसी न्यूज – चाकण दुहेरी हत्याकांड प्रकरणात आरोपींची संख्या सहावरून नऊवर गेली आहे. तसेच या प्रकरणातील अनेक बाबी पोलिसांच्या तपासात समोर येत आहेत. खून झालेल्या ‘त्या’ दोघांना आरोपींनी गरम सळईने आणि लाकडी दांडक्याने मारहाण केली आहे. दोघांचाही जीव गेल्याची खात्री झाल्यावर एका आरोपीने थेट पोलिसांना फोन करून त्याच्या हॉटेलमध्ये दोन मृतदेह असल्याची माहिती दिली. मात्र, पोलिसांना मृतदेह संशयास्पद वाटल्याने माहिती देणाऱ्या आरोपीकडे चैकशी केली. त्यात या दुहेरी खुनाचा उलगडा झाला.

हा प्रकार खेड तालुक्यातील करंजविहिरे येथे घडला.

बाळू सिताराम गावडे (वय 26), राहुल दत्तात्रय गावडे (वय 28, दोघे रा. आसखेड खुर्द, ता. खेड, जि. पुणे) अशी खून झालेल्या दोन कामगारांची नावे आहेत. वीटभट्टी मालक आणि त्याच्या आठ साथीदारांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. त्यामध्ये मयत बाळू गावडे याच्या पत्नीचा देखील समावेश आहे.

खेड तालुक्यातील करंजविहिरे येथे संशयित आरोपीचे हॉटेल आहे. हॉटेलसमोर त्याची वीटभट्टी आहे. मयत बाळू गावडे आणि राहुल गावडे त्या वीटभट्टीवर काम करत होते. बाळू याचे लग्न झाले असून त्याला दोन अपत्ये आहेत. बाळूचे वीटभट्टी मालकाच्या 21 वर्षीय मुलीसोबत प्रेम जडले. बाळूचे लग्न झालेले असतानाही तिने त्याच्यासोबत पळून जाण्याचा निर्णय घेतला.

15 जुलै ही तारीख निश्चित करून त्यांनी एकमेकांचा हात धरून गाव सोडले. त्यासाठी बाळूचा मित्र राहुल त्याला पूर्ण मदत करत होता. राहुलने दुचाकीवरून त्या दोघांना खोपोली येथे सोडले. इकडे तरुणी पळून गेल्याचे घरच्यांना समजले असता घरच्यांनी तिचा आणि बाळूचा शोध सुरू केला. घरच्यांसोबत बाळूला शोधण्यासाठी राहुल देखील तरुणीच्या घरच्यांसोबत होता. मात्र, तो आतून बाळूला साथ देत होता.

दोन दिवसानंतर 17 जुलै रोजी बाळू आणि त्या तरुणीला शोधण्यात घरच्यांना यश आले. दोघांना आरोपीच्या हॉटेलमध्ये आणण्यात आले. तिथे गरम लोखंडी रॉडने बाळूला मारहाण करण्यात आली.

दरम्यान बाळूला त्याचा मित्र राहुल याने साथ दिली असल्याचे समोर आले. तरुणीच्या वडील आणि नातेवाईकांनी राहुलला देखील तापलेल्या रॉडने आणि लाकडी दांडक्याने मारले. अमानुषपणे मारहाण झाल्याने दोघांचा मृत्यू झाला. संतप्त नातेवाईकांनी त्या 21 वर्षीय तरुणीला देखील मारहाण केली.

विशेष म्हणजे या प्रकरणात बाळू गावडे याच्या पत्नीचाही सहभाग होता. बाळू आणि राहुल यांचा जीव गेल्याचे लक्षात आल्यानंतर मुलीच्या आरोपी बापाने थेट पोलिसांना फोन केला आणि त्याच्या हॉटेलमध्ये दोन मृतदेह असल्याची माहिती दिली.

पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. मृतदेहांची पाहणी केल्यानंतर पोलिसांना या प्रकरणात काहीतरी गडबड असल्याचे जाणवले. पोलिसांना फोन करणाऱ्या आरोपीची पोलिसांनी उलट तपासणी केली. त्यात हा संपूर्ण प्रकार बाहेर आला. पोलिसांनी नऊ जणांना ताब्यात घेतले आहे.

चाकण पोलीस तपास करीत आहेत.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.