Chakan: तोतया फायनान्स अधिकाऱ्यांनी फिनोलेक्स पाईपसह टेम्पो लांबविला

एमपीसी न्यूज – फिनोलेक्स कंपनीचे पाईप घेऊन जाणाऱ्या टेम्पो चालकाला अडवून फायनान्सचे लोक असल्याचे सांगून 6 लाख 29 हजार रुपये किंमतीच्या पाईपसह टेम्पो असा 11 लाख 31 हजार रुपयांचा ऐवज चोरून नेला. ही घटना गुरुवारी (दि.6) सायंकाळी सहा ते रात्री पावणे बाराच्या दरम्यान चाकण शिक्रापूर रोडवरील पेशवाई हॉटेल जवळ घडली.

याप्रकरणी टेम्पो चालक भास्कर श्रीपतराव लांडगे ( वय 35, रा. काष्ठी श्रीगोंदा रोड ता. श्रीगोंदा, जिल्हा. अहदमनगर) यांनी चाकण पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार तीन अनोळखी इसमांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

लांडगे गुरुवारी रात्री टेम्पो नंबर एमएच 16 ए. वाय 6198 मधून फिनोलेक्स कंपनीचे पाईप घेऊन जात होते. शिक्रापूर रोडवरुन जात असताना तीन अज्ञात आरोपी आले. त्यांनी टेम्पो अडविला. आम्ही फायनान्सचे लोक आहोत असे सांगत 5 लाख रुपये किमतीचा टेम्पो आणि 6 लाख 29 हजार 512 किंमतीचे फिनॉलेक्स कंपनीचे पाईप असा 11 लाख रुपये किंमतीचा ऐवज जबरदस्तीने चोरून नेला. चाकण पोलीस अधिक तपास करत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.